Saturday, December 24, 2022

हसलीस तू 

की  मी फुलतो 

दिसलीस तू 

की मी जगतो 

वेड तुझे 

अजूनही तसेच 

तुझ्यावाचून मनी 

काही नसेच 

भेटलीस तू 

की  माझा मी असतो 


सांगण्या तुला 

काय करावे 

चंद्र तारे नको 

हात धरावे 

ऐकलेस तू 

नाव तुझे 

ते श्वास 

मी घेतो 

बोलतो थोडे खरे 

पण मनातून बोलतो 


- अमित जहागीरदार 

  ११ Dec २०२०

प्राण गुरू श्वास गुरू

प्राण गुरू श्वास गुरू
आहेस माझा ध्यास गुरू
येवोत कितीही संकटे
पाठीशी आहे 
हा विश्वास गुरू

मनात नाही किंतु
पटतो किती तू
असो मनी तुझा विचार
वा न तुला चिंतु

क्षणाचा नाही विलंब
घेऊन मला संग
करण्या निवारण
एखादी शंका 
वा नवा मनाचा ढंग

होते जे मनात सगळे
क्षणात विरून गेले
चरणी तुझ्या टेकले
घेऊन मनातली
रावणाची दहा शकले

दिलास आधार
नेणार तू  पार 
स्वप्न माझे
होणार साकार

जन्म मरणाचे फेरे
जगाचे नियम न्यारे
न शिरो मनात
अहं चे वारे

दे मजला आशीर्वाद असा
न सुटो गुरू नाद तुझा

अमित जहागीरदार
२३ जुलै २०२०

पेटणारे रान

पेटणारे रान

भावनांचा मी भुकेला, भावनांचे तू दान दे
मागणे मोठे न अमुचे नभाहून लहान दे ।।

वेगळा असा माझ्या मागण्याचा ओघ आहे
देणार का नाहीस ? ओठांना माझ्या तुझे कान दे ।।


विचार नुसता देण्याचा तुला खूप देऊन जाईन
पुन्हा मागण्याची मला नवी अशी तहान दे ।।


मागतांना -देतांना समजणे होत राहील
मलाच तू मागावे एवढाच मजला मान दे  ।।

शमेल का भूक आपुली हा प्रश्न नको
संपल्यावर मागेन हि तृप्त होण्याचे भान दे ।।

रोज येऊन तुझ्याकडे मागतो मी जीवना !!
शांत होईल माझ्याकडून असे पेटणारे रान दे ।।


-अमित जहागीरदार
 ३० एप्रिल २०१९

हे भास माझे

हे भास माझे कि हात तुझे
येऊनी हातात देती साथ कुठे

मी छेडितो गाणे नवे
अन पाहुनी नभी थवे
वाहणाऱ्या पाखरांना रात कुठे

असतोच ना तो तिमिर
असतोच ना नदीस तीर
पण वाहणाऱ्या मनासारखे नाद कुठे

मी व्यक्त होत जातो
मी व्यस्त होत जातो
तुझ्यात विलीन होईल ती जात कुठे ?

अमित जहागीरदार
३१ मार्च २०२०
(कॉवीड lockdown )

एका प्रेमाची कथा

एका प्रेमाची कथा 

भाग्य हे आमुचे की
दिसलात तुम्ही
नुसत्याच दिसल्या कुठे ?
आम्हाला फसल्यात तुम्ही

वाटले नव्हते हे
झालेत कसे सोप्पे
गवसले कसे आम्हास
हे सौंदर्याचे कप्पे

काय सांगावे रूपाचे तुमच्या
आकाशी कीर्तीच्या ध्वजाचे खांब आहे
कॉलेजात १०० मुले
तुम्ही यायच्या म्हणून ५०० ची रांग आहे

पण आमचे काय असे कर्तृत्व 
की ही खाण सौंदर्याची नशिबी आली
पामरच आम्ही !
तुम्हास पाहणे सोहळा
तुम्ही पाहणे दिवाळी झाली

काय बघितले माझ्यात ?
प्रिये पुसतो आज ऐटीत
इतक्या वर्षाच्या संसारानंतर
नव्या जोशात
तुझ्या माझ्या "साठीत "

प्राणसख्या, मजला होते माहित
कित्येक होते मागे
कोण होता धूमकेतू कोण भुंगा
यायचे वाटेत रोखण्या नजर
कधी विनाकारण मागे पिंगा

नुसते बघून अर्धे गारद
कुणी पहिल्याच नजरेत म्हणे बस झाले
येईना बोलण्यास पुढे
विचारायचे तर ना कुणाचे धाडस झाले

तूच सख्या तो होता
नुसताच नव्हता बघत
बोललास मनातलं अन
मन गेलास माझे जिंकत

अशी आपुली निराळी
रसभरीत कथा आहे
आज हि विचारतात ना तुला सगळे
कित्येकांची हीच व्यथा आहे

प्रेम करण्यात मजा आहे
पण ते सांगण जमलं  पाहिजे
उत्तर नाही जरी आलं तर
नव्या बागेत मन रमल पाहिजे

सापडतच एखादं  फुल
नव्या गंधाचं नव्या रंगाचं
पाखरू होऊन मनसोक्त उडावं
मिळणार नक्की फुल आपल्या ढंगाचं


अमित जहागीरदार
९ एप्रिल २०२०
(लॉक डाउन मधले पराक्रम)

शब्दांचा गुंता

शब्दांचा गुंता 

शब्द त्याने चोरले
राहिले मागे भावनांचे जाळे
तो न सुटे गुंता सहज
अर्थ - दाट/क्लिष्ट /गहिरे ।।


आजवर कळलेच नाही
लिहायचे काय होते मला
उद्रेक उरले मागे
शब्द वाटती कोते मला
त्याने चोरले शद्ब तेवढे
जे असती कागदावर काळे ।।
तो न सुटे गुंता सहज
अर्थ - दाट/क्लिष्ट /गहिरे ।।

मागणे एवढेच माझे
वापरा शब्द जपूनी
वार त्यांचे होतील
म्हणतील तुम्हास खुनी
बंध तुटती जन्मभराचे वा
क्षणात खुलती ताळे ।।
तो न सुटे गुंता सहज
अर्थ - दाट/क्लिष्ट /गहिरे ।।

- अमित जहागीरदार
  १८ जुलै २०१६
  पुणे 

कपाळीचा टिळा

कपाळीचा टिळा 

दुःख हे नाही की तू आहेस जवळी
तुला न माझ्या वेदनांची काळजी ।।

दूर कुठे वेशीवरच्या आर्त किंकाळ्या
शमवितो त्या पहिले अन करतो सलगी ।।

मला नव्हते ठाऊक तुझ्यात एक झरा आहे
दोन थेम्ब मलाही दे मी जन्मांची कोरडी ।।

आग माझ्यातही होती मी पेटले होतेच ना
तुझ्यासाठी जळायचे होते पण लागली वाळवी ।।

तू कुरतडून टाकले तरी मला चालेल
पायातली धूळ होईल पण लाव एकदा कपाळी ।।

-अमित जहागीरदार
२७ मे २०१९
पुणे 

शोधतो स्वतःला अजून


आलो कसा इथे याचे भान नाही 

न फुलताच गळेल ते मी रान नाही 


श्वास घेतले किती मोजले कित्येकदा 

सोडले निःश्वास न सदा-न-कदा 

संकटांना भिडलो डोळ्यात अश्रूंची खाण नाही ।


बघितले जे दिसले, मागितले जे भावले 

म्हटले जे कळले, चाखले जे वाढले 

पाचांना  समजावून घेतले सगळे इथे (तब्येतीस ) छान नाही ?


मी कोण, जाणार कोठे ? 

मी कसा होणार कुठे ?

याच वेडात गुंतणार हे ध्यान नाही ?


दिसता प्रकाश माझा होता 

रातीचा काळा माझा होता 

शोधतो स्वतःला, अजून हेही ज्ञान नाही !


- अमित जहागीरदार 

  ३० मे २०२१

  ००:२०

तू पाऊस झालाय कि काय

तू पाऊस झालाय की काय 

कुठे टिकताहेत तुझे इथे पाय  ।।


घेऊन येतो घन नीळा 

दिस होतो मग रातीचा 

बरसतो एक दोन वेळा 

पुन्हा मन होत पारखं 

कुठं हि लागतं नाय 

तू पाऊस झालाय कि काय  ।।


वाट पाहावी तर येत नाही 

येतो जेव्हा बेत नाही 

हवं तेव्हा देत नाही

काय तुझं चाललाय  ?


ये रे असा उफाळून 

चल दूर मला घेऊन 

राहील तुझ्यात भिजून 

आता माझं आभाळ भरलाय 

तू पाऊस झालाय कि काय  ।।


अमित जहागीरदार 

११ जून २०२१

भेटलो कोण 
किती आले सोबत 
गणित त्याचे मांडले नाही 
साथ किती क्षणांची 
किती जीव जडला 
तुटला जीव म्हणून भांडले नाही 

जपले स्वतःला 
जपले साऱ्यांना 
राख सजवली मनाची 
रस्त्यात येऊन सांडले नाही 

खपले किती वाण 
मनात येऊन व्रण 
बोलून व अबोलाचे 
कळले तसे हे देखील वागणे चांगले नाही 

विचारले पुन्हा पुन्हा 
घडला काय गुन्हा 
न मला उमजले 
न तुला कळले 
आता त्यावर बोलणे यात भले नाही 

अमित जहागीरदार 
१५ जून २०२२

अशी अपुली प्रीत आहे

आसमंतास लाजवेल अशी अपुली प्रीत आहे
मी -तू न भासावे  वेगळे, अशी अपुली रीत आहे ।।

मी रंग मागतो फुलांचे केशी तुझ्या माळण्या
विस्कटतील श्वासाने, जरी केशभूषा नीट आहे ||

ये मिठीत ये, मोजणे न होवो अंतर आपल्यातले
रोमांचित होऊ दे अंग, तू तशीच रसरशीत आहे ||

रात्रीस वाटे मोद पाहून प्रीतीचा खेळ आपुला
नसे ठाऊक गुपित, तू दिवसाही तितकीच धीट आहे ||

प्रिये ये अशी बाहुत  नको ना एवढ्यात जाऊस
नको ऐकवू आता ओठांनी दे तुझ्या ओठी जे गीत आहे ||

नको मग ते लटके भांडण नको तो वाद आपल्यात
हरलीस तू कि दुःख मला, विजयात तुझ्या जीत आहे ||

अमित जहागीरदार
१३/०४/२०२०

देवपण

देवपण

मनात नको कोठार भावनांचे, तू व्यक्त हो
आंदण तुला नभाचे घे भरारी, तू मुक्त हो ।।

शब्द शब्द सापडो  क्रांती ही नवी
करण्यास आक्रमण, विचारांचे तू रक्त हो ।।

विजय नसतो सोपा एवढा कळेल तुला
साचले डोळ्यात भाव जरी, तू सक्त हो ।।

दिशा दाही फिरून येतील चरणी तुझ्या
सामावले सारे तुझ्यात की तू रिक्त हो ।।

आधार का मागतो? आदर्श हो तू तुझा
मिळाले देवपण जरी असे, तू त्यक्त हो ।।

- अमित जहागीरदार
   २४. ०५. २०२०
   (लॉक डाउन )

पावलांची साथ

पावलांची साथ

वेगळीच ना तुझी माझी वाट होती
जुळतील त्या वाट हि जाणीव दाट होती

हातात हात गुंफले अन वाटले
ही आपुली जन्मभराची साथ होती

मन एक झाले : तू माझीच भाषा बोलतो
डोळ्यात दिसते मी हि एक खास बात होती

भोवती आपुल्या प्रेमाचे धुके दाट
नभी तारकांनी सजलेलीरात  होती

घेतलंय आणा भाका किती अन वचने  किती
जगलो जन्म किती जरी सात जन्माची गाठ होती

क्षणात घडले काय असे? तुलाही कळलेच नाही ना
समाजवते पुन्हा पुन्हा मनाला: दोन पावलांची साथ होती

अमित जहागीरदार
११ मे २०१९

तू साथ दे

तू साथ दे

पायातली ही वाट नेणार कुठे
मिळाले काय ? देणार कुठे ?
गवसले आकाशही
मला वाटणार थिटे

केलाय मी असा काय गुन्हा
कधी फुटेल तुला पान्हा
चुकणार नाही पुन्हा
वळतील तुझ्याकडे पाय पुन्हा

क्षमा तू कर ते काम तुझे
अथवा कोण घेणार नाम तुझे
पायात आलो म्हणून घे जवळी
विसरीन कसे मग धाम तुझे

दे मनाला धीर आता
डोळ्यात दाटले नीर आता
तू साथ दे एवढेच मागणे
नसे कशाची फिकीर आता

१८ जुलै २०२०

भेटलो होतो तो क्षण आठवला

 भेटलो होतो तो क्षण आठवला 

विरघळलेला कण न कण आठवला

वेचतात ना जसे हातात पावसाला 

मनात मी तो साठवला 

भेटलो होतो तो क्षण आठवला


तू नुसतेच बघितले होते 

तुला काय माहित 

काय मनात घडले होते 

भरून येतो घेऊन पाऊस तो मला घन आठवला


फुलला तनुवरी पिसारा 

केसांशी खेळे गार वारा 

डोळ्यात चमकतो नव तारा 

सजते मी नखशिकांत तो सोहळा तो सण आठवला


नजर तुझी जादू करते 

काय सांगू रात कशी सरते 

मनात नुसती हुरहूर उरते 

स्वप्न पाहते  रोज नवे आज हिरवा चुडा खण आठवला


ये असा माझ्यात ये सख्या 

दे अनुभूती जुन्या नव्या 

शमणार आता हा वणवा 

भेटलो होतो तो क्षण 

पुन्हा चटकन आठवला


अमित जहागीरदार 

०५-०६-२०२१

पुणे 

नाव तुझे येते ओठी

नाव तुझे येते ओठी


नाव तुझे येते ओठी हे असे घडता भोवताली 

सुख नसे तरी भले नको चिंतेची रेष भाळी ।।


किती वेदना त्या दिसती चहूकडे 

खिन्न वार्तांचा रोज पाऊस पडे 

लागो तिरावर बोट वादळातली सरो हि रात काळी ।।


हंबरडे दु:खाचे तुटल्या जीवाच्या तारा 

मनात भीतीचे राज्य डोळ्यात समुद्र खारा 

कोण वाचला? कसा जगतोय ? उद्या कुणाची पाळी ?


आशा हीच देवा तू न सोडणार हात 

कुणी तुला स्मरो वा न,  तुझी मिळेल साथ 

दे आरोग्य ! दे आयुष्य ! उभा याचक मी घेऊन थाळी ।।

नाव तुझे येते ओठी हे असे घडता भोवताली ।।

- अमित जहागीरदार 

  १३ मे २०२१

  पुणे 

आलास नाही तू सख्या

आलास नाही तू सख्या 

रात जरी पुनवेची 
वाटे तुझ्याविना अवस 
आलास नाही तू सख्या 
झाले किती दिवस 

मी मला समजावले 
कधी पटले कधी ना जमले 
महाल जरी हा माझा 
वाटे ना यात रस 

कणभर आवाज झाला 
तर वाटे तू मज आला 
वाढे धडधड मनाची 
भरे मग नस नस 

ये असा ये माझ्यात 
न अंतर तुझ्या माझ्यात 
येण्याने तुझ्या बहरेल  मी 
नसेल मग जीवन नीरस 

नेहमीचे तुझे बहाणे 
आवडे  मज वाट पहाणे 
येशील ना रे आता 
काय करू नवस 

अमित जहागीरदार 
१३ जून २०२१

ओढ तुझी

ओढ तुझी

ओढ तुझी येते घेऊन तुझ्याकडे
तुझा झालो येऊन तुझ्याकडे
हे बंध असतात जन्म जन्मांचे
आणले सर्वस्व सजवून तुझ्याकडे

वाट पाहतो या क्षणाची
कळली स्पंदने हृदयाची
अंकुर फ़ुटले  मनाला प्रीतीचे
कळी हि आली उमलून तुझ्याकडे

मी मागितले प्रेम सागराचे
दिलेस तू मुक्त आकाशाचे
बुडालो प्रेमात आकंठ तुझ्या
आलो नभी फिरून तुझ्याकडे

अमित जहागीरदार
१ मे २०२०
(लॉक डाउन मधले पराक्रम )

येणार ना साजणा

येणार ना साजणा


वाट पहाटे मी तुझी येणार ना साजणा
वाटते मजला कवेत घेणार ना साजणा ।।

दूर कोठे सारंगीचे सूर बेरंग वाटतात
श्वासांचे गीत तुझे ऐकवणार ना साजणा ।।

जळते तुझ्यासाठी होऊनी पतंग दिनरात
विझलेचं जरी आज नभी उगवणार ना साजणा ।।

कित्येकदा मी आशेने ना केले दार घरचेही बंद
एकदा पाहावे तुला भेटलो जरी सरणावर ना साजणा ।।

अमित जहागीरदार
१२ एप्रिल २०२०
(लॉक डाउन मधले पराक्रम)

तू पड झड होती

तू पड झड होती

पाहावे एकदा तुला मनात माझ्या तळमळ होती
बघण्यास यावे तर गावात तुझ्या हळहळ होती ।।

मी जाळले माझेच घर अश्रूंनी माझ्या
भेटणाऱ्याच्या डोळ्यात एक जळजळ होती।।

तुही बघितले होते प्रेमाने माझ्याकडे प्रेमाने
चाहत्यांची तुझ्या हीच खंत अन मळमळ होती।।

आकाशात एका वादळाची नांदी होती
रानात मनातल्या माझ्या नुसती सळसळ होती।।

तू गेलीस ते झाले बरे एक प्रकारे
नवी पालवी फुटेल कारण तू पड झड होती।।

- अमित जहागीरदार
   २३. ०५. २०२०
   २०. ५३
  (लॉक डाउन मधले पराक्रम )

सात जन्माचे बंध

विचार तुझाच मनी न एका क्षणाची उसंत आहे
प्रेम आमचे समजूतदार वेड हे जातिवंत आहे

दिसलेत का तुला कधी चेहऱ्यावर दुःख
बघितल्या पासून तुला ना तमा ना खंत आहे

मी दिसतो तुझ्या सारखा म्हणतात सगळे
डोळ्यात तुझ दिसणं मला तितकंच पसंत आहे

त्यांना आवडत गीत ओठांनी म्हणून कानांनी ऐकायचं
आम्ही वेगळे ओठांच गाणं ओठांनी ऐकणं पसंत आहे

भेटलीस तू की वेळ जातो क्षणात उडूनी
तू येणार असली की मात्र वेग त्याचा संथ आहे ?

वाटत तुला भेटलो होतो या आधी सुद्धा कित्येकदा
ना काही दिवसाच ना वर्षांचे हे सात जन्माचे बंध आहे

अमित जहागीरदार
१७ एप्रिल २०२०
लॉक डाऊन मधले पराक्रम

भाग्य

भाग्य

हातावरल्या रेषांमध्ये भाग्य अपुले शोधात होतो
उंच भरारी घेता नभी, थडगे अपुले खोदत होतो
आलीत वादळे किती कळले नाही
चित्त माझे जराही ढळले नाही
लाटांना मनातल्या सुनामी होण्यापासून रोखत होतो

मी दिलेत वचन पूर्ण करण्यासाठी
मी बघितले स्वप्न पूर्ण करण्यासाठी
तुटलेत कधी ते - अलगद पापण्यांनी वेचीत होतो

पुन्हा पुन्हा तुझी वाट पहाणे
न येण्याचे तुझे नवे बहाणे
समजावता मनाला तुझ्यातला "मी" शोधात होतो

मला कळले फक्त तुला देणे
न बघता - किती होते बाकी येणे
तू घेण्याचे आणि मी युगाच्या साथीचा हिशेब मांडत होतो

भोवताली जरी अंधार होता
आठवणींच्या तुझ्या आधार होता
मनात तूच जरी श्वास शेवटचे मोजत होतो

अमित जहागीरदार
६ मार्च २०१९
पुणे

पहिलीच ती सर होती

 पहिलीच ती सर होती 


पहिलीच ती सर होती 

भेटण्यास मला आतुर 

कोरडी मी होते ना 

तू आला घेऊन पूर ।।


बघणे दिसणे पाहणे 

झाले होते नित्यासारखे 

नजर तुझी भिडली 

मी मला झाले पारखे ।।


का वेड लावती जीवा 

का घेते तुझ्याकडे धावा 

फक्त नजरेने झाले घायाळ 

नवीन तुझा काय कावा ?


विळखा तुझ्या हातांचा 

असतो माझ्या तनुवरी 

किमया तुझी न्यारी 

अलगद हलते हनुवटी ।।


ओठांना ओठांचं देणं 

स्पंदनात कण  कण 

पहिलीच ती सर होती 

शान्त झाले रण रण  ।।


अमित जहागीरदार 

२० जून २०२२

न बंध आज मला न प्रश्न आज तुला 

का विचारायचे मग झाल्यात का चुका ?


तुला कळलेच होते 

जीव गुंतला तुझ्यात 

श्वासात तू असते 

मी जोवर हयात 

प्रेम आहेस का ? मग तू विचारते पुन्हा  


नको ते सांगणे 

दुसऱ्याच्या कथा 

मला कळल्या नाही 

तुझ्या काही व्यथा 

प्रेम का विसरते ? झालो का मी परका ?


बोलणे जाड गेले 

तू किती प्रिय आहे 

माझ्यापेक्षा मला 

तू किती स्वीय आहे 

प्रश्न येतोच का मग हा सारखा ?

का विचारायचे मग झाल्यात का चुका ?


अमित जहागीरदार 

१० जून २०२२ 

अलिबाग 

पेटले मनाचे रान

भार हे वाहू किती, बाहुत ना प्राण आता ।।
जाळल्या भावना, पेटले मनाचे रान आता ।।

कुर्सीनात द्या परत मला 
विकला कवडी मोल आम्ही मान आता ।।

फकिरांना वेध सोन्याचे 
वेचणारे झाले इथे आता मग  महान आता ।।

तो वेगळा म्हणून आला 
झाला येऊन असा अपुल्यात समान आता ।।

रंग बघून झेंड्याचे भांडलो 
रंग पहा सांडलेल्या रक्ताचा किमान आता ।।

अमित जहागीरदार 
२२ ऑगस्ट २०२२

रोज आठवून



रोज आठवूनी नाव
तुझे रडणे जमणार नाही
तू गेलास निघून
जगणे उरणार नाही

आठवले ते क्षण
ओले तुझ्या मिठीत झाले
क्षण ते टोचतात पण
दुखणेच कळणार नाही

आकाशाचे प्रेम मी दिले तुला
मी झाले तू -असे व्यापले मला
आज अडकला जीव कुठे
अन गवसणार नाही 

सूर्य तो क्षितिजावरी
वाट तू दूरची
हात हात घेऊनि चाललो
पायात ती रुतणार नाही

अरे काय तुझ्या होत्या व्यथा
घेऊन येतोस नवीन कथा
नादान आयुष्या !!
का छळणार नाही 

७ जानेवारी २०१०
पुणे

नवे नवे दृष्टिकोन

नवे नवे दृष्टिकोन 


भावनांचे डोह फुटलेत 

तू भिजलिस का ?

जगण्याचे बेत झालेत त्यात 

तू दिसलीस का ?


मी दिलेले वचन मजला 

कळले काय होते का तुला 

रिक्त जागा आयुष्यतल्या 

तू भरशील का ??


मी तुझा होतो असा 

पाण्यातला मासा जसा 

श्वास होऊन माझ्यात 

तू भिनलीस का ?


वचनांचे शब्द दोन 

नवे नवे दृष्टिकोन 

निसटले हातातून हात जेव्हा 

तू हसलीस का ??


अमित जहागीरदार 

२३-२४ सप्टें २०२०