Friday, April 11, 2014

व्यथा


रोज आठवूनी नाव तुझे
रडणे जमणार नाही मला
तू गेलास निघूनी जेव्हा
जगणे उरणार नाही मला ||

आठवले ते क्षण ओले
तुझ्या माझ्या मिठीत झाले
ते क्षण टोचतात पण
दुखणेच कळणार नाही मला ||

आकाशाचे प्रेम मी दिले तुला
श्वास तू होता असे दिले तुला
आज अडकला जीव कुठे
अन गवसणार नाही मला ||

सूर्यास्त तो क्षितिजावरी
वाट ती दूरची जाणारी घरी
हातात हात घेवुनी चाललो
पायास रुतणार नाही मला ||

अरे काय तुझ्या होत्या व्यथा
वाटले प्रेम अन आयुष्य व्यथा
एवढेच का राहिले होते आपुल्यात
जाळणे प्रेमाला कळणार नाही मला ||

- अमित जहागीरदार
  ७ जाने २०१०

का निघून गेलीस तू

श्रावणातल्या सरींना घाम फुटावा अशी तू
ऊन फुटले पहाटेचे अन नारंगी झाली तू ||

कळलेच नाही तेव्हा भाव तुला माझ्या नजरेतला
दिसताच डोळ्यात माझ्या रूप तुझे लाजली तू ||

या मोकळ्या केसांना रेश्मी श्वास पडले
अन रोज स्वप्नात माझ्या रात्र रात्र जागली तू ||

मी क्षणात उडूनी जातो देह माझा विरून गेला
हातात हात घेवुनी जेव्हा डोळ्यांनीच बोललीस तू ||
 
जगावल्या रात्री चांदण्याच्या कुशीत
माझी म्हणूनी आली अश्या स्वप्नांच्या रात्री तू ||

आज फक्त देह उरला श्वास झालेत फक्त वारा
प्राण हरवला माझा अशी का निघून गेलीस तू ||

-अमित जहागीरदार
  २३ डिसेंबर २००९

उमेद


दाटलेला कंठ घेवुनी
शोधतोय आता गाव नवे
सावरणे कसले मग
बघ ! टाकलेत त्याने डाव नवे ||

                     तुला मारलेली हाक माझी
                     मलाच ऐकू आली कधी
                     मी माझे विसरुनी गेलो
                     तुझेच मजला नाव नवे ||

दू:ख तेव्हाचे दू:ख होते
प्रेम तेव्हाचे सुख होते
पण मनावर पडतात अचानक
प्रेमाचेच हे घाव नवे ||

                     हे विसरणे- आठवणे रोज रोज
                     डोळ्यात असावे रोज रोज
                     फुले नवी उमलली भोवती
                     कोमेजणारे मनात हे प्रभाव नवे ||

या जगण्यातला श्वास तू
झालीस आता फक्त भास तू                     
वेदना माझ्या कळल्याच नाही
उमगले प्रेमाचे ‘भाव’ नवे ||

                     या वेडात मी जगतांना
                     नवे दू:खाचे गीत गातांना
                     मनात एक उमेद आली
                     बघ ! सुखाचे घेराव नवे ||

अमित जहागीरदार
५ फेब्रु २००८