Sunday, December 20, 2015

माझे हसणे, माझे जगणे ,माझे श्वास तू


माझे हसणे, माझे जगणे ,माझे श्वास तू

हसऱ्या गालावरती फुलतो वसंत ऋतू ।।
माझे हसणे, माझे जगणे ,माझे श्वास तू  ।।

अंधारात एक ज्योत तुझ्या डोळ्यांची किलबिल
तुझा सुगंध वाहताच खुलते चैतन्य हवेतील
थकलेल्या माझ्या मनाचा ध्यास तू ।।
माझे हसणे, माझे जगणे ,माझे श्वास तू  ।।

करतेस तू नाजूक चाळा, बोटात बोट अडकवतेस
डोळ्यात तरळते प्रेम पण उगाच खोटी रुसतेस
अन हलकेच उडवतेस दोन्ही तुझे बाहू  ।।
माझे हसणे, माझे जगणे ,माझे श्वास तू  ।।

तू असतेस जवळी जेव्हा चांदणे नाचते फेर धरुनी
खिन्नपणा मनाचा सगळा जातो दूर रुसुनी
मन बांधते आनंदाचा गगनी एक सेतू
माझे हसणे, माझे जगणे ,माझे श्वास तू  ।।

अमित जहागीरदार
२४ जून २००१, रात्रौ  ११.४०

Saturday, October 31, 2015

प्रेम कराव बिनधास्त प्रेम

मनातल गाणं धुंद गाव गाणाऱ्यांनी
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।

ऊन तिरप झेलण्याऱ्या गवताच्या वाटेत
किंवा एखाद्या झाडाखाली मोगऱ्याच्या बागेत

तिला समोर ठेवून नुसत बोलायचं डोळ्यांनी ।।
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।

वाट तिची बघत झाडाखाली झुराव
दिसताच ती, अलगद वाऱ्यावरती उडाव
क्षितीज गाठाव जेव्हा बळ दिल असत स्वप्नांनी ।।
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।


ती- तिचा चेहरा दिसतो सगळी कडे 
मन तेव्हा कस पाखरू होवून उडे 
आकाशाला गाठाव प्रेमाचे पंख लावून उडणाऱ्यांनी||
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।

पावसाचा थेंब कळतो कुणावर प्रेम केल्यावर 
श्रावणही निरस वाटतो तिला मिठीत घेतल्यावर 
चातकाच रूप घ्यावं ढग दिसलेत कि भिजणाऱ्यांनी
 ।।
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।

-अमित जहागीरदार 
  १८-११-२०००
   सांगली 

Monday, October 26, 2015

 प्रेम केल्याच समाधान 

प्रेम केल्याच समाधान

माळरान असोवा काहीही गवताच पात होवून फुलता येत
कुणावर जीव ओतून प्रेम केल्याच समाधान नक्की मिळवता येत ।।

दु:ख कशाला करतोय कि
फुल उमलल नाही
फुलण्याच तंत्र जरी
त्याला उमगल नाही

तू तर प्रेमान पेरल
नेमान दिल - खत  पाणी
त्याला उमलायच नसेल तर
तू का आणतोस डोळ्यात पाणी

सगळ सगळ करूनही ढगांना तर आपल्यावर रुसता येत
कुणावर जीव ओतून प्रेम केल्याच समाधान नक्की मिळवता येत ।।

तू प्रेम केलास मनापासून म्हणून आकाश झालास 
तीच मन हाताएवढ म्हणून का निराश झालास 
तुझ प्रेम कस तुझ्या रक्तात भिनलय 
तिच्यासाठी तुझ प्रेम श्वासात बसलाय 
म्हणून तर तिला ते एका क्षणात हवेत फेकता येत 
कुणावर जीव ओतून प्रेम केल्याच समाधान नक्की मिळवता येत ।।

तू प्रेम केलस म्हणून तुला गंध कळलेत 
आणि तुझ्याकडे पाहून फुलाचे रंग हसलेत 
आणखी एक वेड लागलाय वाऱ्याशी बोलायचं 
शेतातल्या पिकासारख लयीत डोलायचं 
आकाशातल्या चंद्राकडे बघून तुला गालात खुदकन हसता येत 
कुणावर जीव ओतून प्रेम केल्याच समाधान नक्की मिळवता येत ।।

अमित जहागीरदार 
१६-१०-२०००
सांगली 

Sunday, October 25, 2015

उन्मेष

उन्मेष

वाटते  आता मला गाण्यात शब्द राहिले नाही
तू येताच समोरी मनात मी स्तब्ध राहिले नाही  ।।

स्पर्श तुझा होताच चंद्र मनी उगवला
क्षण ज्यात जगावे तोचि आज गवसला
तू श्वास झाला प्राण झाला मीच माझ्यात उरले नाही ।।

हातात तू हात घेता मी बहरते
डोळ्यात तुझ्या मी दिसता मी फुलते
नजर तुझी करून गेली जादू मी वेगळी सजले नाही ।।

घे मला मीठीत मी तरंगू लागेन
श्वास घेण्या पलिकडे जगू लागेन
भरगच्च कर पाश बाहूंचे अजून मी थकले नाही ।।

येवू दे गती स्पंदनांना धडधडणे नवे
गुंतू दे तनुत तनु अंगी गोंदणे नवे
रमले तुझ्यात इतकी मी  तसे जगले नाही ।।

ओढ जीवाला लागली आता तुझी
वाट पाहुनी थकली गीत गाता तुझी
हे तूच जमवलेस शब्द, मी काहीच रचिले नाही ।।

- अमित जहागीरदार
 ०७ - ०९ - २०१३
 पुणे

वेडे मन

मन हे माझे तुझे वेडे तुझी वाट बघते
या वेड्याला सांगू कसे 
वाटेवरती साथ बदलते ।।

त्या शपथा अन ते वचन 
दोन जीवांचे एकच मन
पण दिसता हित क्षणात वेडे हात बदलते
मन हे माझे वेडे तुझी वाट बघते ।।

तुझ्या  मनाचे आवेश निराळे
भूक किती हे कधी न कळे
जागून मिठीत तुझ्या रात जळते
मन हे माझे वेडे तुझी वाट बघते ।।



- अमित जहागीरदार

 ऑक्टोबर २०१५, पुणे 

Tuesday, October 20, 2015

शब्द

शब्द

सुचले काही शब्द असे सुचले
मी बोललो तेव्हा फुल होते पण काट्या सारखे रुतले ।।

न मी पहिले न मी देखिले
नुसतेच कुणाचे तरी ऐकले
परी अर्थावरी स्वैर फुलले
अन अपुलेच माझे माझ्यावरती रुसले ।।

हे आपुलेच असतात अपुले
कधी कधी खूप खेचलेले
सरळ रेषा तर कधी गोळे
पण काहींना कसे न बोलताच कळले
सुचले काही शब्द असे सुचले ।।

अमित जहागीरदार
२०-१०-२०१५
पुणे 

Sunday, September 27, 2015

अवसेचा दिस

अवसेचा दिस

दिवे लागले अंधाराचे, मी वाट शोधत होतो
दिस उगवला अवसेचा मी रात्र चोरत होतो ।।

हे  अंग तुझं  गोर
अन केस काळे भोर
मी पहिले कितीदा ! नजरेला रोखत होतो ।।

तू यावे अन व्हावे
माझे तुझे दावे
तू आणतेस चंद्र अर्धा, मी पूर्ण त्याला म्हणत होतो ।।

या उदास आकाशाला
बांधून फुलांच्या माळा
दिन रात तुला आठवूनी रोज तुला विसरत होतो ।।
दिस उगवला अवसेचा मी रात्र चोरत होतो ।।


- अमित जहागीरदार
   ५ ऑगस्ट २०१५

Sunday, August 9, 2015

थडग्यातले गाणे

थडग्यातले गाणे

भंगल्या ओठात माझ्या
गीत तुझेच फुलावे
मी छेडली भैरवी अन्
तू मैफलीत यावे  ।।

वाटते आत्ताच येथे
पारिजात बहरले होते
सुगंध नुसताच आला
फुल मलूल उमलावे ।।

कोणते कुठले नाते
पक्षी चुकती किनारे
तो विसावा तुझ्या दारी
मी आकाश माझे विसरावे ।।

हे जगण्याचे भय इथले
भावनांचे स्तब्ध इमले
मी थडग्यात गुणगुणतो
सूर- शब्द हि तुझेच सुचावे ।।


अमित जहागीरदार
३ ऑगस्ट २०१५
पूणे


 

दिस येतो अन् जातो

दिस येतो अन जातो

दिस येतो अन् जातो
मी रोजच हे गातो

त्या क्षितिजा वरती
नवी फुलली नक्षी
तुज तीथे मी शोधतो
दिस येतो अन जातो  ।।

यावे अन जावे
जशी येती गावे
तुझ्यापासुनी तुझ्या सवे
तुझ्याशी येणारा प्रवास असतो
दिस येतो अन जातो ।।

हे मोर  पिसारे
आठवणीतले सारे
मी रोज तसा शहारतो
दिस येतो अन जातो ।।

- अमित जहागीरदार
   ३ ऑगस्ट २०१५
    पुणे
 

Sunday, June 7, 2015

उमेद

ठरवल तर बघ दिसतो तसा चंद्र ही सुंदर
पण तुला ठाऊक आहे ना,आहेत  तिथे डोंगर अन् विवर

"रित्या" पेल्याच दुःख वाचलय आपण
"भरला" अस त्याला कित्येकदा म्हटलय आपण
तू बघणारच नाहीस पेल्याकड, अशी पण येईल सर ।।

या जीवनाने कधी शिकवले का नियम
आजच का मग रडायच जर दिला थोडा "गम"
तू तुझ्या सोबत आहेस! कुणीही नसलं तर ।।

वाट कठीण असली तरी वाट आहे ना
थकलीस आज पण वाटेवरून जात आहेस ना
ठेव विश्वास, जसा असतो रात्रीचा पहाटेवर ।।

मला सुचलेले हे दोन बोल
ठरलेत तुला आधार देण्यास जरी फोल
उमटेल ना एक स्मित तुझ्या ओठांवर ।।

अमित जहागीरदार
५ जुन २००८

Saturday, June 6, 2015

राहिलेल जगणं

राहिलेल जगणं

माझं दुःख माझे अश्रू
माझं मन कस सावरु

मोकळं करायला गेलो
ज्याच्या जवळ मन
तो वाहतोय त्याहीपेक्षा
जड दुःखाच सरण

सगळेच बुडालेले अश्रूंमधे
कर्णकर्कश्च आवाज रडण्याचा
पाणीही तसेच खारट
दुःखाचा फक्त  वेगळा साचा

मी धापा टाकत मग
रमलो थडग्यांच्या बागेत
वाटले ईथेच घेता येईल
स्वताःला अश्रूंसह कवेत

वाटले ईथे मिळेल
थोडा एकांत थोडी निरवता
पण साला नशीब !!!
तिथेही ऐकू एक हुंदका आला

थडग्यातल्या आवाजाला म्हटले
बाबा रे तू का रडतोस ?
तुझं तर दुःख सुख सगळंच पुरून गेल !!
"रडत राहीलो जन्मभर अन् आज उमगलय
जगणं राहून गेल
जगणं राहून गेल "

अमित जहागीरदार
१६ अॉक्टो २०१४
सकाळ ५.५०

Thursday, April 2, 2015

आपण सारे अर्जुन

आपण सारे अर्जून

भार होतो चुकांचा
अंग आता जीर्ण झालय
आयुष्य बाकी समसमान जरी
जगणं मात्र पूर्ण झालय

देहाचे लाड करता करता
मनाचा होत आलाय चोथा
ऐकले त्याचे कित्येकदा
त्याची अपूली भलतीच गाथा

सांभाळता यांना मलाच
माझा यावा थकवा
अंधार दाटावा भोवताली
अन् मीच मिटवावा दिवा

वाटले मीच माझ्या वाटेत
काटे पेरले होते
पाहायचे स्वप्न जगण्याचे पण
वेध थडग्याचे लागले होते

श्वासांचा ईतका तिटकारा
नव्हता कधी आला मला
त्यांनीच का आजवरी
जगवला मला ??

प्रश्न झाले भोवताली
बाजार भरवला प्राण अर्पून
कृष्ण सोबती नसणारे
आपण सारे अर्जुन

-अमित जहागीरदार
६ मार्च २०१५
चेन्नै-पूणे फ्लाईट (३६,००० फूट)

Title Credit - व पु

वादळ

वादळात मी उभी एकटी
आधार मला माझाच नाही
तू दिसतोस उभा समोर
प्रश्न घेवून काही ||

मी दिल्याघेतल्याचे मोजलेच कुठे
फुललाच नाहिस तू
मन तुझे कोमेजलेच कुठे
घेवून आलास न विसरता हिशेबाची वही ||

ते दोन श्वास हरवलेले माझे
ओठातले गाणे
स्वरहिन अन् विरलेले माझे
हाती माझ्या फक्त वीण राही ||

का असा तू कोरडा भिजतो
गाठ जन्माची अन्
पहील्या मिठीत थिजतो
खुणावतात तुला फक्त दिशा दाही ||

यश मिळो तुला तुझे भाग्यातले
आकांक्षा पुर्ण अन्
चिंतेन की व्हावो तुझे भले
हेच स्वप्न मन माझे पाही ||

अमित जहागीरदार
३ एप्रिल २०१५

Sunday, March 29, 2015

रडणे

आज रडावेसे वाटते पण
अश्रूंची साथ नाही
चालायचा मार्ग आयुष्याचा पण
हाती कुणाचाच हात नाही ||

मी तुझ्या जवळ आहे
हा नुसताच आवाज सोबतीला
मी पूसले देखील नाही
"येतेस ?" असे तिला
ती हो म्हणाली की नाही
हा प्रश्न मनातून जात नाही ||

घोंगावत आले तेव्हा
शपथांचे वारे
साक्षीला होतो चंद्र
अन् नभातले तारे
लपला चंद्र कोठे आता
अमावस्येची आज रात नाही ||

मी माझे म्हटले त्याला
जे नव्हते माझे कधी
वाटते आज का जडली ही
आपले पणाची व्याधी
जो तो अपुल्या दुनियेत
स्थान मला त्या जगात नाही ||

मी गेल्यावरही उगवतील
उद्याच क्षितीजावर दिवस नवे
वाटते गाळावीत माझ्यासाठी
कुणी फक्त दोन आसवे
कुणी थांबावे क्षणभर मजसाठी
ऐवढेही मी मागत नाही ||
आज रडावेसे वाटते पण
अश्रूंची साथ नाही ||

खोल मनात

मी असाच राहतो मुक्त
वादळाने वेढलेला
शांत असतो चेहरा
मनात कलह माजलेला

चांदण्या मोजण्यास जातो
आकाशाला कवेत घेवून
निसटून जाता काही
पाणी येते डोळ्यातून
पुढल्या क्षणी असतो मेरूवरी चढलेला

मलाच मी बघत बसतो
वाटते आता हसु येईल
हसवतो मी सर्वांना
दुःख त्याचे उडून जाईल
रंग असतो मैफलीत माझाच मग उरलेला

अरूणोदयाच्या किरणांनी
उमगते जीवनाचे कोडे
त्याच संध्येला उगाच
वाटे आयुष्य कोरडे
अन् धुंद त्या रात्रीला चंद्र असतो भेटलेला

फुलांच्या बागेत मजला
राख दिसते चहुकडे
वाळक्या पारिजाताचा
गंध धरणीवर पडे
जगण्यावरचा पण विश्वास कधी न ढळलेला

- अमित जहागीरदार
१७ जानेवारी २००५
पूणे

Saturday, March 28, 2015

तशी असावी अपुली प्रीती

जेष्ठाच्या उन्हाने व्याकूळ होवूनी
सरींसाठी आतुरलेली माती
मुग्ध होते गंधाने
तशी असावी अपूली प्रीती ||

पारिजात तो पहाट फुलवी
रोज नवी ती कोमल कांती
जाणूनी तो कोमेजतो
न घ्यावा तो हातावरती
तशी असावी अपुली प्रीती ||

मी तुला पूसावे
तू मला पूसावे
अश्रू येतीलही डोळ्यात कधी
कारण त्याचे न आपण असावे
हात हातातूनी न सूटो
येवोत संकटे किती
तशी असावी अपुली प्रीती ||

मिटेन मी डोळे जेव्हा
आसु न तुझ्या लोचनी यावा
समाधान अपुल्या सोबतीचे
क्षण एकही न जो वाटे विसरावा
एकरुप व्हावे असे
नसावी एकांताची भीती
तशी असावी अपुली प्रीती ||

अमित जहागीरदार
२८ मार्च २०१५
प्रगती एक्सप्रेस

मॉर्डन

हल्ली कविता सुचत नाहीत
शब्दांना अर्थ महाग झालेत
भावनांचे आधुनिकीकरण
आणि विचारांचे प्रभाग झालेत

कुणाला सकारात्मक हवा असतो
आशयाचा द्रूष्टीकोन
कुणाला शब्दांचा श्रुंगार हवा
कुणा भावनांचे पूर्ण  मौन

काल मधे जगलो तर
भुतकाळाचे फोफावते
आजच्या आशांचे दान
मग तो करुन जातो रिते ||

नव्या जोमाचा नवा काळ
नुसता समोरुन खुणावतो
कवेत त्याला घेता घेता
मी पुरता दमतो ||

विसाव्याला बसलो तर
पुन्हा प्रश्न तोच पडतो
शब्दांमागे धावतांना
अर्थाचा जीव जळतो ||

नकोच ते शब्द अन् ते नियम
श्वास त्यांनाही घेवू द्या
शोधत मला आता
चेहर्यांना काही येवू द्या ||

२२ फेब्रु २०१५

Sunday, March 1, 2015

प्रेम …

प्रेम …
सूर्य मावळायला लागला की
पायांनी तुझी वाट धरणं
बोललीस काहीतरी छान की
अलगद तुझा हात धरण  ।।

आपलंस चंद्राच चांदण
हलकेच मनाच माझ्या
तुझ्याकडे रांगण

तुझ्या डोळ्यात
खोल खोल गुंतण
आठवणीत तुझ्या
रात्र रात्र जागण

तुझ्या वाटेत
निपचित पडून राहण
तुझ्या हसण्यावर
मोर पिसासारखं वाहण

तुझ्या आनंदात
बेभान होऊन नाचण
आणि माझ्या दु:खाला तुझं
अश्रूंनी न्हाऊ घालण

दोन थेंब पडताच पावसाचे
तुझी आठवण येण
यालाच म्हणतात ना
कुणावर प्रेम जडण

- अमित जहागीरदार
२३ एप्रिल २०००
सांगली