Sunday, October 25, 2015

उन्मेष

उन्मेष

वाटते  आता मला गाण्यात शब्द राहिले नाही
तू येताच समोरी मनात मी स्तब्ध राहिले नाही  ।।

स्पर्श तुझा होताच चंद्र मनी उगवला
क्षण ज्यात जगावे तोचि आज गवसला
तू श्वास झाला प्राण झाला मीच माझ्यात उरले नाही ।।

हातात तू हात घेता मी बहरते
डोळ्यात तुझ्या मी दिसता मी फुलते
नजर तुझी करून गेली जादू मी वेगळी सजले नाही ।।

घे मला मीठीत मी तरंगू लागेन
श्वास घेण्या पलिकडे जगू लागेन
भरगच्च कर पाश बाहूंचे अजून मी थकले नाही ।।

येवू दे गती स्पंदनांना धडधडणे नवे
गुंतू दे तनुत तनु अंगी गोंदणे नवे
रमले तुझ्यात इतकी मी  तसे जगले नाही ।।

ओढ जीवाला लागली आता तुझी
वाट पाहुनी थकली गीत गाता तुझी
हे तूच जमवलेस शब्द, मी काहीच रचिले नाही ।।

- अमित जहागीरदार
 ०७ - ०९ - २०१३
 पुणे

No comments:

Post a Comment