Sunday, March 29, 2015

खोल मनात

मी असाच राहतो मुक्त
वादळाने वेढलेला
शांत असतो चेहरा
मनात कलह माजलेला

चांदण्या मोजण्यास जातो
आकाशाला कवेत घेवून
निसटून जाता काही
पाणी येते डोळ्यातून
पुढल्या क्षणी असतो मेरूवरी चढलेला

मलाच मी बघत बसतो
वाटते आता हसु येईल
हसवतो मी सर्वांना
दुःख त्याचे उडून जाईल
रंग असतो मैफलीत माझाच मग उरलेला

अरूणोदयाच्या किरणांनी
उमगते जीवनाचे कोडे
त्याच संध्येला उगाच
वाटे आयुष्य कोरडे
अन् धुंद त्या रात्रीला चंद्र असतो भेटलेला

फुलांच्या बागेत मजला
राख दिसते चहुकडे
वाळक्या पारिजाताचा
गंध धरणीवर पडे
जगण्यावरचा पण विश्वास कधी न ढळलेला

- अमित जहागीरदार
१७ जानेवारी २००५
पूणे

No comments:

Post a Comment