Friday, May 22, 2020

मी पुन्हा जन्मली

 मी पुन्हा जन्मली

रात जशी सरली तुझ्यात मी चांदणी उजळली
गंध श्वासात तू दिला मी कळी होऊन फुलली ।।

भास तुझ्या स्पर्शाचे झालेत कित्येकदा
आज त्याची जादू बाहुत तुझ्या अनुभवली  ।।

चंद्र वाटला थिजा डोळ्यात तुझ्या पाहून
भेटले मला मी अन अंतरे सर्व संपली ।।

वादळे आलीत जी एका श्वासाची होती
भिनलास तू माझ्यात, मी पुन्हा जन्मली ।।

- अमित जहागीरदार
   मार्च २०१९


तुला पहिले

तुला पहिले

पुन्हा तेच सूर मी आज छेदिले
तुला पहिले अन सारे गवसले

तू एक वेड- लागले जीवाला
अर्थ नवा  - माझ्या जीवनाचा
मन पाखरू आकाशात भिरभिरले ।

मी रोज तुझ्या आठवणीत न्हातो
क्षण ना असा जो तुझ्याविना जातो
अन रात्रीने आठवणींचे चांदणे बरसवले ।।

हात तुझा हातात घेऊनी
वाटले जावे दूर देशी
सोबतीला तू आणिक जग एक पावलात संपले  ।।


- अमित जहागीरदार

तू सोबत नसतेस ना

तू सोबत नसतेस ना

दिस जातो होवूनी वेडा
तू सोबत नसतेस ना
बंद डोळे करुनी बघितले तर
तूच आता दिसतेस ना ||

                     मंद मंद पहाट होते
                    तुझ्या तनूत गुंग होते
                     बाहुत येवूनी वाटे
                     गंध हे कसे रोजच नवे ?
                    ओठांच्या रंगात रंगुनी
                     पहाटेला तू लाजतेस ना ||

घरात तू असते म्हणुनी
त्यास घर म्हणावे
तू नसतेस घरात
मन माझे सैर धावे
बहरतो कण कण माझा
पाऊस होवूनी बरसतेस ना ||

                     त्या रात्रींचा गडदपणा
                     दाटला श्वासात आपुल्या
                     मंद चांदणेही येवू शकेना
                     आता दोघात आपुल्या
                     श्वास जेव्हा बोलतो अन
                     “मी तृप्त आहे” म्हणतेस ना ||

अमित जहागीरदार
३ फेब्रु २०१०

तुझ्यापासून तुझ्याकडे

तुझ्यापासून तुझ्याकडे

तू येतेस आणि मी मोर होऊन नाचतो
दिसताच तू क्षण ते चातक होऊन वेचतो ।।

दिवसाला उगवण्याच काम तू देतेस
संध्येला उजळण्याचं काम तू देतेस
चांदणे तू रातीचे मी आकाश होऊन सजतो

दवांतली तू नवी पहाट होतेस
फुलांचा सजलेला घाट होतेस
रंग नारंगी नभाचा मी होऊन खुलतो ।।

दुपारच्या उन्हातला तू विसावा
मंद घुंद मोगऱ्याचा तू गारवा
दिस माझा तुझ्यापासून तुझ्याकडे येऊन संपतो ।।
दिसताच तू क्षण ते चातक होऊन वेचतो ।।

अमित जहागीरदार
२५/०४/२०२०
पुणे
(लॉक डाउन मधले पराक्रम)

दोन तीर

दोन तीर

आपण दोन तीर, एकाच नदीचे
भेटण्याच्या ओढीने वाहतो कधीचे ।।

कुठे कुठे गेलो
कसे कसे बुडालो
दिसतो सारखेही अन एकाच रीतीचे ।।

कधी तुझ्याकडे देऊळ
कधी माझ्याकडे वारूळ
कधी लग्नाची सनई तर दर्शन तिरडीचे ।।

दिसत तुला माझ्या बाजूच
दिसत मला तुझ्या कडचं
वाहतात का आपल्यात असावेच रडीचे ।।

भेटण्याची ओढ आहे
विरहाची खोड आहे
मिलन आपले भव्य, होऊन तट सागरीचे ।।

अमित जहागीरदार
०७ एप्रिल २०२०
पुणे (लॉक डाउन )

फक्त मी उरलेच ना

फक्त मी उरलेच ना

धुक्याचे आंदण
आभाळाचे आंगण
भावनांचे दीप लावले
पण अश्रू विझलेच ना ।।

तू येशील ही ओढ
न येण्याची तुझी खोड
मनात किती कलह
जरी मी फ़ुललेच ना ।।

फुलाचे गंध
पानाचे रंग
विविधता भोवती
तूही ते मागितलेच ना ।।

हातातले हात
जन्मांची साथ
किती आणा-भाका तरी
मागे फक्त मी उरलेच ना ।।

- अमित जहागीरदार
   १० ऑक्ट  २०१८
  दु - १. ३० मि

मिठीत तू असतांना

मिठीत तू असतांना

श्वास उष्ण झालेत बाहुत तुला घेतांना
ये कवेत माझ्या दूर अशी जाताना ।।

गंध केसात माळूनी
धुंद मला का करते
स्पंदनांचे गीत तुझ्या वक्षात फुलतांना ।।

कमरेवरी एक तीळ तुझ्या
ओठांची आठवण ती माझ्या
पहिले कित्येकदा  झूरतांना ।।

नसे डोईवर नभ जरी
हात तुझा हातावरी
बंध कोणते मिठीत तू असतांना ।।



तुझ्याच साठी

तुझ्याच साठी

तुझ्याच साठी
तुझ्याच साठी 
आले जुळून सारे काही ।

ती दूर डोंगराची रेघ 
दाटून येती जिथे मेघ 
नदीला त्या तिचे भान नाही ।।

अंगणी सजला मोगरा 
बघून तुला तो लाजला 
गंध तुझा तो स्वैर वाही ।।

दाट सांडला प्राजक्त 
कोवळा अलगद नि मंद 
फुलाला पुन्हा तुझ्या हाती  ।।

डोळ्यात पाहू तुझ्या किती 
हरवतो गवसतो पुन्हा जरी 
सापडते तिथेच सारे काही  ।।

तनूवर रेंगाळणारा वारा 
केसांना तुझ्या कुरवळणारा 
वेडावतो असा फिरून दिशा दाही 

भावनांचे दाटले रान 
कंठाशी साठले प्राण 
ये जवळी : वाट बघवत नाही 

अमित जहागीरदार 
११ मे  २०१९

प्रेम ओठांची भाषा आहे

प्रेम ओठांची भाषा आहे

तू माझ्या स्वप्नात
येतेस रोज जवळी
अन बोलायचे थांबते
हातात हात घेऊनी
भेट उगाच लांबते

वाट पाहुनी थकलो जरी
धडधड सारखी चालूच असते
सांगायचे ठरवले की
शब्दांचे संपावर जाणे ठरलेच असते

रोजच्या रोज भेटण्याचा
कंटाळा आला जरी
नुसत्याच मैत्रीच्या
किती हा वारा वाहिला तरी

तुझ्या डोळ्यांनी का सांगितले नाही "ते" अजून
दर्शविले जरी मला
उमगले नाही ते अजून

बोलून सांगावे तू
एवढीच आशा आहे
डोळ्यांना नुसते भास होतात पण 
प्रेम ओठांची भाषा आहे !!

अमित जहागीरदार
१३ मार्च २०१९

जातोय सख्या सोडूनि

जातोय सख्या सोडूनी

बुडताच मी
वाचवणारा तू
हसताच मी
टिपणारा तू

दिसताच मी
फुलणारा तू
रुसताच मी
समजावणारा तू

आज मी आहे
जिथे जायचं होतं
अन नजरेत माझ्या
न येणारा  तू

काय झालं तू असा
निघून गेला
न बोलला काही
न काही सांगून गेला

आज जगण्याचे
बेत झालेत आणि तू कुठे ?
हवास तू मला पण
तुला शोधू कुठे ?

माझ्यासाठी जगत होतास ना
मग माझ्यासाठी ये पुन्हा
का जातोय सख्या सोडूनी
न सांगता माझा गुन्हा

अमित जहागीरदार
०३ फेब्रुवारी २०२०


तीच का तू ?

तीच का तू ?

भेटल्यावर बघत बसलो होतो
मनातल्या मनात हसलो होतो
बांधले स्वप्नाचे  एक गाव
अन घरात आपल्या  रमलो होतो

तीच का तू ?
भेटायची सायंकाळी
जिथे सूर्य मावळणारा असतो
पण मी मात्र जीव एक
सकाळपासून तळमळणारा असतो

तीच का तू ?
दिवस रात्र झुरायचो
गच्चं गच्चं बुडायचो
हिंदोळ्यावर झुलायचो
तुझ्या-माझ्यात हरवायचो

तीच का तू ?
विसरलो मी जिच्यासाठी
माझं सगळं आणि अगदी नातं गोत
काय नाव ग तुझ्या मैत्रिणीचं
माझं जिच्यावर प्रेम होत ??

अमित जहागीरदार
२६ फेब २०२०


Sunday, May 17, 2020

तू मला (अजूनही)

तू मला (अजूनही)

पहाटेच्या दवबिंदूंची शपथ
तू मला (अजूनही ) तितकीच आवडतेस
भाव कोणतेही असो मनात
तू मला (अजूनही) तितकीच भावतेस ।।

जागवून रात बोललो
किती दिवसांच्या कथा
कधी हसणारे क्षण आपुले
कधी आपुल्या व्यथा
त्या चांदण्या नभाची आण मला
तू मला (अजूनही) तितकीच वेडावतेस ।।

सांगायचे कधी तुला तर
न सांगणे तुला कधी
डोळ्यात पाहुनी कळतेच
ना काय माझ्या मनी
वेगळे नाहीच आपण माझे रूप दुसरे
तू मला (अजूनही) तितकीच भासतेस ।।

अमित जहागीरदार
२८ एप्रिल २०२०
( लॉक डाउन मधले पराक्रम )