Monday, January 23, 2023

अपूर्ण वर्तुळ

अपूर्ण वर्तुळ 


कोण? कुठला ? नाव काय ? कोणते कुळ ?

फिरतोय दिशा दाही पूर्ण करण्यास वर्तुळ ।।


मोजले कुठे कधी डोळ्यातले पाणी 

कळली नाही काय व्यथा न कहाणी 

हसणे ओठावर तर दुःख खोल अन गूढ ।।


भोगले ते भासे आकाश 

आनंदाचा कुठे असे वास ?

हिशेब "तो" करे पण हाती असे आसूड ।।


उमेद जगण्याची शोधून थकलो आता 

हात जोडले अन टेकवितो माथा

शांत कर वादळ हे ! शोध खरे मूळ  


मातीचा म्हणे जपतो धर्म 

मातीचं जाणे सारे कर्म 

मातीत मिळण्या का जन्मलो ? काय जडले खूळ 

फिरतोय दिशा दाही पूर्ण करण्यास वर्तुळ ।।


अमित जहागीरदार 

१९ जानेवारी २०२३


Saturday, December 24, 2022

हसलीस तू 

की  मी फुलतो 

दिसलीस तू 

की मी जगतो 

वेड तुझे 

अजूनही तसेच 

तुझ्यावाचून मनी 

काही नसेच 

भेटलीस तू 

की  माझा मी असतो 


सांगण्या तुला 

काय करावे 

चंद्र तारे नको 

हात धरावे 

ऐकलेस तू 

नाव तुझे 

ते श्वास 

मी घेतो 

बोलतो थोडे खरे 

पण मनातून बोलतो 


- अमित जहागीरदार 

  ११ Dec २०२०

प्राण गुरू श्वास गुरू

प्राण गुरू श्वास गुरू
आहेस माझा ध्यास गुरू
येवोत कितीही संकटे
पाठीशी आहे 
हा विश्वास गुरू

मनात नाही किंतु
पटतो किती तू
असो मनी तुझा विचार
वा न तुला चिंतु

क्षणाचा नाही विलंब
घेऊन मला संग
करण्या निवारण
एखादी शंका 
वा नवा मनाचा ढंग

होते जे मनात सगळे
क्षणात विरून गेले
चरणी तुझ्या टेकले
घेऊन मनातली
रावणाची दहा शकले

दिलास आधार
नेणार तू  पार 
स्वप्न माझे
होणार साकार

जन्म मरणाचे फेरे
जगाचे नियम न्यारे
न शिरो मनात
अहं चे वारे

दे मजला आशीर्वाद असा
न सुटो गुरू नाद तुझा

अमित जहागीरदार
२३ जुलै २०२०

पेटणारे रान

पेटणारे रान

भावनांचा मी भुकेला, भावनांचे तू दान दे
मागणे मोठे न अमुचे नभाहून लहान दे ।।

वेगळा असा माझ्या मागण्याचा ओघ आहे
देणार का नाहीस ? ओठांना माझ्या तुझे कान दे ।।


विचार नुसता देण्याचा तुला खूप देऊन जाईन
पुन्हा मागण्याची मला नवी अशी तहान दे ।।


मागतांना -देतांना समजणे होत राहील
मलाच तू मागावे एवढाच मजला मान दे  ।।

शमेल का भूक आपुली हा प्रश्न नको
संपल्यावर मागेन हि तृप्त होण्याचे भान दे ।।

रोज येऊन तुझ्याकडे मागतो मी जीवना !!
शांत होईल माझ्याकडून असे पेटणारे रान दे ।।


-अमित जहागीरदार
 ३० एप्रिल २०१९

हे भास माझे

हे भास माझे कि हात तुझे
येऊनी हातात देती साथ कुठे

मी छेडितो गाणे नवे
अन पाहुनी नभी थवे
वाहणाऱ्या पाखरांना रात कुठे

असतोच ना तो तिमिर
असतोच ना नदीस तीर
पण वाहणाऱ्या मनासारखे नाद कुठे

मी व्यक्त होत जातो
मी व्यस्त होत जातो
तुझ्यात विलीन होईल ती जात कुठे ?

अमित जहागीरदार
३१ मार्च २०२०
(कॉवीड lockdown )

एका प्रेमाची कथा

एका प्रेमाची कथा 

भाग्य हे आमुचे की
दिसलात तुम्ही
नुसत्याच दिसल्या कुठे ?
आम्हाला फसल्यात तुम्ही

वाटले नव्हते हे
झालेत कसे सोप्पे
गवसले कसे आम्हास
हे सौंदर्याचे कप्पे

काय सांगावे रूपाचे तुमच्या
आकाशी कीर्तीच्या ध्वजाचे खांब आहे
कॉलेजात १०० मुले
तुम्ही यायच्या म्हणून ५०० ची रांग आहे

पण आमचे काय असे कर्तृत्व 
की ही खाण सौंदर्याची नशिबी आली
पामरच आम्ही !
तुम्हास पाहणे सोहळा
तुम्ही पाहणे दिवाळी झाली

काय बघितले माझ्यात ?
प्रिये पुसतो आज ऐटीत
इतक्या वर्षाच्या संसारानंतर
नव्या जोशात
तुझ्या माझ्या "साठीत "

प्राणसख्या, मजला होते माहित
कित्येक होते मागे
कोण होता धूमकेतू कोण भुंगा
यायचे वाटेत रोखण्या नजर
कधी विनाकारण मागे पिंगा

नुसते बघून अर्धे गारद
कुणी पहिल्याच नजरेत म्हणे बस झाले
येईना बोलण्यास पुढे
विचारायचे तर ना कुणाचे धाडस झाले

तूच सख्या तो होता
नुसताच नव्हता बघत
बोललास मनातलं अन
मन गेलास माझे जिंकत

अशी आपुली निराळी
रसभरीत कथा आहे
आज हि विचारतात ना तुला सगळे
कित्येकांची हीच व्यथा आहे

प्रेम करण्यात मजा आहे
पण ते सांगण जमलं  पाहिजे
उत्तर नाही जरी आलं तर
नव्या बागेत मन रमल पाहिजे

सापडतच एखादं  फुल
नव्या गंधाचं नव्या रंगाचं
पाखरू होऊन मनसोक्त उडावं
मिळणार नक्की फुल आपल्या ढंगाचं


अमित जहागीरदार
९ एप्रिल २०२०
(लॉक डाउन मधले पराक्रम)

शब्दांचा गुंता

शब्दांचा गुंता 

शब्द त्याने चोरले
राहिले मागे भावनांचे जाळे
तो न सुटे गुंता सहज
अर्थ - दाट/क्लिष्ट /गहिरे ।।


आजवर कळलेच नाही
लिहायचे काय होते मला
उद्रेक उरले मागे
शब्द वाटती कोते मला
त्याने चोरले शद्ब तेवढे
जे असती कागदावर काळे ।।
तो न सुटे गुंता सहज
अर्थ - दाट/क्लिष्ट /गहिरे ।।

मागणे एवढेच माझे
वापरा शब्द जपूनी
वार त्यांचे होतील
म्हणतील तुम्हास खुनी
बंध तुटती जन्मभराचे वा
क्षणात खुलती ताळे ।।
तो न सुटे गुंता सहज
अर्थ - दाट/क्लिष्ट /गहिरे ।।

- अमित जहागीरदार
  १८ जुलै २०१६
  पुणे