Tuesday, May 8, 2018

उद्रेक

उद्रेक

दे अमृत ओठातले
शांत कर तन प्रत्येक हि
बिलगून जा असा मला
हाऊ दे भावनांचा उद्रेक हि ।।

स्पर्श तुझा मोरपीस  आग जणू लागली
भोवती तट बर्फाचे पण अंगात माझ्या काहलि

मी घेते मिटून डोळे
नजरेची तुझ्या अजब फेक हि ।।

कोणास वाटे कुठले युद्ध येथे खेळलो
आसमंतात जाऊनी या फुलात लोळलो

रोमांच उठले असे -
रुतली फुले अन स्पर्शाचे मेख हि ।।

कुठे ठेवू तुला पाखरा? रंग तुझे सापडतील ना
उरले न निशाण मागे पण डोळ्यात माझ्या दिसतील ना

हवेवर मी स्वार होईल
मागे न दिसे एक पावलांची रेघ हि ।।

- अमित जहागीरदार
  ३१ जुलै २०१७

व्यथा


व्यथा

कुणी कुणासाठी जीव जाळला
ऐकल्यात मी कथा किती
मागितले दोन थेंब पाणी
सांगितल्या लोकांनी व्यथा किती  ।।

आयुष्यभराची व्यथा होती
त्याचे वाटले न दु:ख तसे
अपुले आपुले वाटणारे
झालेत अचानक रुक्ष कसे

असणे नसणे : मागणे देणे
तश्या फक्त अवस्था
तुझ्या वर न वेळ येवो
न ढळो आमुची आस्था

अरे देण्यात काही मजा असते
दिलेत का कधी कुणा
दिलेत कि कळेल
दिले कि घ्यावेसे वाटते पुन्हा

असो तुझे विचार मोठे
आचारात हि फरक पडो
पुन्हा मागणे हेच कि
तुझ्या वर मागण्याची वेळ न येवो ।।


- अमित जहागीरदार
  २४ ऑगस्ट २०१६



हक्क माझा

हक्क माझा

मी न वाकेन आता
जरी भार जगाचा माथ्यावरी
श्वास घेईन तमाचे
स्वार होऊन प्रकाशावरी

न मला भीती
जगण्याची वा मरणाची
जिद्ध माझी न संपणारी
हातून चांगले घडण्याची

मी करेन तेच
मलाही ज्याचा गर्व व्हावा
हसू कुणाच्या ओठांवरती फुलावे
हाच माझा धर्म व्हावा

झिजत जावे सर्वांसाठी
गंध पसरावा भोवताली
मागणे नाही अजून काही
झुकतो तुझ्या पायी

दे तेवढे जे तू देऊ शकतो
मी न त्यातला जो रडत बसतो
याचकाचे ढोंग नाही
हक्क माझा मागून घेतो

अमित जहागीरदार
२०१३

फुलून येते मी अशी

फुलून येते मी अशी

स्पर्श होताच तुझा फुलून येते मी अशी
शब्द सुचतात कसे? आणि गाते मी अशी ।।

नसतोच पक्षी गगनात
तूच भिरभरतो मनात
येतोस जसा जवळी आणिक भिजते मी अशी ।।

वाटते मजपाशी खूप आहे
मनात अजुनी तुझी ओढ आहे
दिव्याची वात जशी जळते मी अशी ।।

जगण्याचा तूच मोह
आनंदाचे चहूकडे डोह
पंख लावून सुखाचे उडते मी अशी ।।


अमित जहागीरदार
२०१५

बंध

बंध

कळलेच ना काय काळजात चालले
कोणती हि कंपने काय मनात धावले ।।

कोणती हुरहूर घेऊनी
दिवस आला उगवूनी

आरश्यात आज का रूप माझे सजवले  ?

गंध नवा माझ्यात
श्वास भिनलंय श्वासात
वाटते मज नवे आकाश आज गवसले ।।


तू येणार तू बघणार
तूच तू अन मीच मी उरणार
तू होणार मी मग मागे काय उरले ?


देह  माझा तुझ्याच साठी
श्वास घेते तुझ्याच साठी
बंध जन्माचे अपुले साक्षीला हात हातातले !

- अमित जहागीरदार

५ जुलै २०१०


थांब ना सख्या!

थांब ना सख्या! रात्र उश्याशी हरवून जाईन
हे भास नवनवे मी तूझ्यात मिसळून जाईन ||
कधी माझे कधी तुझे
नवे जुने तेच बहाणे
सोस चंद्राची किरणे पहाट मग थांबून  जाईन ||
स्पर्श तोच ना असतो तुझा
नवा‌ कसा मग भासतो मला
अंगावरी तुझ्या स्पर्शाची नक्षी रंगून जाईन ||
हे न‌ असे घडणार पुन्हा
न ऐकले न दिसले कुणा
गंध अपुल्या मीलनचे गुपीत सांगून जाईन ||
भासतोस माझेच एक रूप तू
तहान तू माझी अन् ‌भूक तू
एक होवू असे श्वास श्वासांत गुंतून  जाईन ||
-अमित जहागीरदार
१५ मार्च २०१८
पूणे