Sunday, December 16, 2018

सांग ना तुझ्यात अस काय आहे ??


सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??


तू दिसलीस अन
मनात गुलमोहर फुलाला होता
तू हसलीस गाल्यातल्या गालात तर
मी हातात शुक्रतारा धरला होता

तू येतेस ना  त्या किनाऱ्यावर
तेव्हा म्हणे सूर्य मावळत असतो
कि तुझ्या डोळ्यातल्या तेजावर मत्सराने
लाल बुंद होईन जळत असतो
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??



तू भेटलीस कि
चांदण अनुभवायला मिळत
मनातला निशिगंधाला
फुलायला मिळत
आकाशातल्या चंद्राला
माझ्याशी बोलावस वाटत
लालचुटुक गुलाबाला हसावस वाटत
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??

तुझ्या केसांचा झटका
हृदयाचा ठोका चुकवतो
मनातल्या गाण्याचा ठेका चुकवतो
तू केस मोकळे सोडलेस कि
मी हरवतो माझ्याही नकळत
मनातल्या मनात राहतो
एक गाण गुणगुणत

सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??

तू येशील म्हणून 
तुझ्या वाटेत पडून राहतो 
तू दिसलीस कि वाऱ्यासंगे 
स्वच्छंद उडून जातो 
तुझी एक नजर भेट 
माझ्यासाठी गगनविहार होतो
मनातल्या वीणेची 
झंकारलेली तार होतो
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??

तू हातात हात घेतलास कि 
विसरणं अनुभवायला मिळत 
मनात तुझ्याच विरघळण अनुभवायला मिळत 
आकाशात ढगांनी कोरलेल 
एखाद गीत वाचायला मिळत 
क्षणभर तरी श्वासांशिवाय 
जगायला मिळत 
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??

तू दूर करतेस केसांना 
अलगद गालावरून 
मला वेड लागलंय तुला 
तेव्हाच बघायचं चोरून 
मग दुसरीकडे कुठेच 
मन माझं  वळत नाही
तुझ्या केसांवर जळाव कि हातावर 
मलाच माझ कळत नाही 
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??

पाऊस पाडण्यासाठी ढग हवेत 
यावरून माझा विश्वास उडतोय 
मनात तर रोज रोज नवा 
पारिजात फुलतोय  
पण गंध म्हणजे काय ते 
तुझ्याजवळ आल कि च कळत 
मग मन त्या कोपर्यावरील 
चाफ्याला उगाचच हिणवत 
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??

ज्या दिवशी तू मला
नुसतीच दिसतेस 
अवांतर पण थोडस 
माझ्याशी बोलतेस 
त्या दिवशी चांदण्या मोजण्याचं 
धाडस करावास वाटत 
आकाशातल्या चंद्राशी 
खूप खूप बोलावस वाटत 
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??

तुझा स्पर्श झाला कि 
भिजण म्हणजे काय कळत 
मन मात्र उगाच 
तुझ्या लिपस्टिकवर जळत 
तुझ्या मिठीत आल्यावर 
मनातल दु:ख उडून  गेल्या सारख वाटत 
माझ् "मी " पण तुझ्यात विरून गेल्यासारख वाटत 
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??
सांग ना  तुझ्यात अस काय आहे ??


अमित जहागीरदार 
८ -१० -२०००
सांगली

जगायचं ना ? मग प्रेम करा !

जगायचं ना ? मग प्रेम करा !

जगायचं ना ? मग प्रेम करा !
हात कुणाचा तरी हाती धारा !

तुम्ही वेडे होता
जेव्हा ती येणार असते
किती वेळ वाट पाहतोय
हे हि कळणार नसते

तिची वाट पाहत राहता
अगदी तासान तास
ती दिसताच घेता
रोखलेला श्वास

वाट पाहण्यात मजा असते ना ?
गोड गोड सजा असते ना ?

ती दिसताच होतो आनंद खरा
जगायचं ना ? मग प्रेम करा !  ।।१ ।।

तिला बोलवायचं एकदा
बागेत चोरून
बसायचं जवळ तिच्या
हाती हात घेवून

ती काढेल अभ्यासाचे विषय
आपण व्हायचं फक्त प्रेममय
कुठली एखादी कविता ऐकवा
किंवा गाण्यातली छान लय

बागेत भेटण्यात मजा असते ना ?
डोळ्यांनी बोलण्यात मजा असते ना ?

आणि मनात फुटतो भावनांचा झरा
जगायचं ना ? मग प्रेम करा !  ।।२।।

अमित जहागीरदार
१४ नोव्हेंबर २०००
रात्रो ११
सांगली 

Tuesday, October 16, 2018

तू कसा कोरडा?

तू कसा कोरडा?

भावनांचा सागर भिजला रात्रीत माझ्या
तू कसा कोरडा? असून कुशीत माझ्या ।।

लोटले मी मलाच दूर तुझ्या पासून
अन पहिले पुन्हा तुला मिठीत माझ्या ।।

वाटले नव्हते असे काही बघताच तुला
तू आलास कि मी ओढिलें प्रितीत माझ्या ।।

भेटले, देखिलें, भरले बाहुत कित्येकदा तुला
रस ना उरला मग का रे तुला भेटीत माझ्या ?

अमित जहागीरदार
२३ ऑगस्ट २०१८
पुणे 

Tuesday, May 8, 2018

उद्रेक

उद्रेक

दे अमृत ओठातले
शांत कर तन प्रत्येक हि
बिलगून जा असा मला
हाऊ दे भावनांचा उद्रेक हि ।।

स्पर्श तुझा मोरपीस  आग जणू लागली
भोवती तट बर्फाचे पण अंगात माझ्या काहलि

मी घेते मिटून डोळे
नजरेची तुझ्या अजब फेक हि ।।

कोणास वाटे कुठले युद्ध येथे खेळलो
आसमंतात जाऊनी या फुलात लोळलो

रोमांच उठले असे -
रुतली फुले अन स्पर्शाचे मेख हि ।।

कुठे ठेवू तुला पाखरा? रंग तुझे सापडतील ना
उरले न निशाण मागे पण डोळ्यात माझ्या दिसतील ना

हवेवर मी स्वार होईल
मागे न दिसे एक पावलांची रेघ हि ।।

- अमित जहागीरदार
  ३१ जुलै २०१७

व्यथा


व्यथा

कुणी कुणासाठी जीव जाळला
ऐकल्यात मी कथा किती
मागितले दोन थेंब पाणी
सांगितल्या लोकांनी व्यथा किती  ।।

आयुष्यभराची व्यथा होती
त्याचे वाटले न दु:ख तसे
अपुले आपुले वाटणारे
झालेत अचानक रुक्ष कसे

असणे नसणे : मागणे देणे
तश्या फक्त अवस्था
तुझ्या वर न वेळ येवो
न ढळो आमुची आस्था

अरे देण्यात काही मजा असते
दिलेत का कधी कुणा
दिलेत कि कळेल
दिले कि घ्यावेसे वाटते पुन्हा

असो तुझे विचार मोठे
आचारात हि फरक पडो
पुन्हा मागणे हेच कि
तुझ्या वर मागण्याची वेळ न येवो ।।


- अमित जहागीरदार
  २४ ऑगस्ट २०१६



हक्क माझा

हक्क माझा

मी न वाकेन आता
जरी भार जगाचा माथ्यावरी
श्वास घेईन तमाचे
स्वार होऊन प्रकाशावरी

न मला भीती
जगण्याची वा मरणाची
जिद्ध माझी न संपणारी
हातून चांगले घडण्याची

मी करेन तेच
मलाही ज्याचा गर्व व्हावा
हसू कुणाच्या ओठांवरती फुलावे
हाच माझा धर्म व्हावा

झिजत जावे सर्वांसाठी
गंध पसरावा भोवताली
मागणे नाही अजून काही
झुकतो तुझ्या पायी

दे तेवढे जे तू देऊ शकतो
मी न त्यातला जो रडत बसतो
याचकाचे ढोंग नाही
हक्क माझा मागून घेतो

अमित जहागीरदार
२०१३

फुलून येते मी अशी

फुलून येते मी अशी

स्पर्श होताच तुझा फुलून येते मी अशी
शब्द सुचतात कसे? आणि गाते मी अशी ।।

नसतोच पक्षी गगनात
तूच भिरभरतो मनात
येतोस जसा जवळी आणिक भिजते मी अशी ।।

वाटते मजपाशी खूप आहे
मनात अजुनी तुझी ओढ आहे
दिव्याची वात जशी जळते मी अशी ।।

जगण्याचा तूच मोह
आनंदाचे चहूकडे डोह
पंख लावून सुखाचे उडते मी अशी ।।


अमित जहागीरदार
२०१५

बंध

बंध

कळलेच ना काय काळजात चालले
कोणती हि कंपने काय मनात धावले ।।

कोणती हुरहूर घेऊनी
दिवस आला उगवूनी

आरश्यात आज का रूप माझे सजवले  ?

गंध नवा माझ्यात
श्वास भिनलंय श्वासात
वाटते मज नवे आकाश आज गवसले ।।


तू येणार तू बघणार
तूच तू अन मीच मी उरणार
तू होणार मी मग मागे काय उरले ?


देह  माझा तुझ्याच साठी
श्वास घेते तुझ्याच साठी
बंध जन्माचे अपुले साक्षीला हात हातातले !

- अमित जहागीरदार

५ जुलै २०१०


थांब ना सख्या!

थांब ना सख्या! रात्र उश्याशी हरवून जाईन
हे भास नवनवे मी तूझ्यात मिसळून जाईन ||
कधी माझे कधी तुझे
नवे जुने तेच बहाणे
सोस चंद्राची किरणे पहाट मग थांबून  जाईन ||
स्पर्श तोच ना असतो तुझा
नवा‌ कसा मग भासतो मला
अंगावरी तुझ्या स्पर्शाची नक्षी रंगून जाईन ||
हे न‌ असे घडणार पुन्हा
न ऐकले न दिसले कुणा
गंध अपुल्या मीलनचे गुपीत सांगून जाईन ||
भासतोस माझेच एक रूप तू
तहान तू माझी अन् ‌भूक तू
एक होवू असे श्वास श्वासांत गुंतून  जाईन ||
-अमित जहागीरदार
१५ मार्च २०१८
पूणे

Friday, March 16, 2018

आई आज तू असायला हवी होतीस

आई आज तू असायला हवी होतीस 


आई आज तू असायला हवी होतीस
तुझा - तुझ्याविना चाललेला संसार
दुरून बघायला
तू आज असायला हवी होतीस ।।

बाबाला ब्रेड वरती जॅम देखील नीट लावता येत नाही
घाई झाली कि पायात मोजे देखील घालता येत नाहीत
माझ्यासोबत पोट धरून हसायला
तू आज असायला हवी होतीस ।।

मी माझी सकाळी वेणी घालून शाळेला जाते
बाबाने घालून दिलेली वेणी काही तासच टिकते
माझ्या विस्कटलेल्या वेणीवरचे jokes ऐकायला
तू आज असायला हवी होतीस ।।

अभ्यास घेतांना माझ्यापेक्षा बाबाला झोप जास्त येते
office मधल्या तणावानंतर त्याची मागणी रास्त असते
झोपलेल्या बाबाला कुरवाळतांना बघायला
तू आज असायला हवी होतीस ।।

मी तशी शूर आहे ! घाबरवायला येतो रात्रीचा अंधार
तुझ्या मायेची उब आठवते अन मिळतो त्याचा आधार
पण कौतुकाची थाप पाठी द्यायला
तू आज असायला हवी होतीस ।।

एकटीच असते- शून्यात बघते ! जग म्हणत सगळ तेव्हा
माझ्या मनात तू आणि नातं आपुल, भासत वेगळं तेव्हा
माझं विश्व तू असं मिठीत घेऊन म्हणायला
तू आज असायला हवी होतीस ।।

पण आई हा असा विरह नसता तर
हे सगळे प्रश्न नसते
आयुष्य इतके क्लिष्ट नसते
मला तर नाही कळत असत किती वेगळं
पण त्याचा अनुभव द्यायला


तू आज असायला हवी होतीस ।।
आई तू आज असायला हवी होतीस ।।


अमित जहागीरदार
१३ मे २०१७
पुणे 

Tuesday, February 13, 2018

प्रेमात तुझ्या पडल्यापासून

प्रेमात तुझ्या पडल्यापासून

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळल काय असत
आपल्या कुणाची वाट बघण
अन दिसताच तू
कळत चातकाला श्रावण मिळण ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
श्वासात मी गंध भरू लागलो
खुल्या भकास आकाशात
प्रीतीचे रंग  भरू लागलो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
लांब वाटा लहान झाल्या
तुझ्या डोळ्यांच्या दोन ज्योती
जीव का प्राण झाल्या ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
चंद्र माझ्याशी रोज बोलतो
वेडेपणाच्या किस्स्यांवर तुझ्या
दिल खुलास हसतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मनात लाखो तरंग उठतात
बागेतल्या फुलपाखरांचे जसे
हातावरती रंग सुटतात ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
आकाश अगदी इवलास वाटत
बहरलेल्या पारिजताका सारखं
हसावस वाटत  ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळायला लागलाय :
समुद्रात का लाटा उठतात
तुला भेटून जाताना
माझ्या का वाटा चुकतात ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
शुक्राची चांदणी मंद हसते
अन रोजची नीरस संध्याकाळ
मला आता धुंद भेटते  ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मी सूर्यास्त रोज बघतो
अन  त्या नारंगी किरणात
मनसोक्त भिजतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
गार हवा अंगाला बोचू लागते
अन तुझ्या वर एक कविता
तू भेटली कि सुचू लागते

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मोर थुई थुई नाचू लागला
अन वारा शिळ घालत
तुझे गाणे गावू लागला ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
खांद्यावर माझ्या पाखर रुळतात
आणि बघून मला शेतातली
कणस डुलतात ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कोकिळेची तान कळते
अन तुझ्या आठवणीच्या
चंद्राची रात्र जळते ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळल का असतो रंग निळा आकाशाचा
अन का क्षणात जातो
पाण्याबाहेर प्राण माश्याचा ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
रात्र माझ्याशी बोलायला येते
अन एक वेडी चांदणी
कुशीत माझ्या निजायला येते ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
काय असते मुक्ती कळली
अन प्रेमात असलेली भव्य दिव्य
शक्ती कळली ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मी निशिगंधाचे फुल होतो
पडताच पाऊस
गंध पसरवणारी धूळ होतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळली मला गुलाबी थंडी
अन मोगऱ्याच्या कळ्यांची
कळली मदिर धुंदी ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मी पाखरांचा रव होतो
पहाट प्रहरी जमणारे
पाकळीवरचे दव होतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
समजायला लागलाय नदीच वाहण
अन मिलनास आतुरलेल्या
सागराच्या कुशीत शिरणं ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
येतो तुझ्या वाचून जगण्याचा वीट
हवा हवासा वाटतो
तुझ्या हातांचा स्पर्श धीट ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
जीवन झालाय सार्थ
तू माझ्या प्रेमाचा सागर
मी तुझा तृषार्त ।।



अमित जहागीरदार
१४ फेब २००० ते २०१८