Saturday, May 7, 2016

नवी उमेद

पुन्हा माझी कविता मला कळू लागली
सहवासात चांदणी पुन्हा सजू लागली ।।

मी उघडताच डोळे
हसू तुझे उगवते
तुझ्या गंधाची झुळूक
पहाटे दारी येते
रात्र रोज माझ्या सवे आठवत तुला जागू लागली  ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।

दिवसभर मन झुरते
तुला पाहण्यासाठी
बांधतो  रोज नव्या
जन्मोजन्मीच्या गाठी
बागेतली कळी माझ्यासंगे खुलू लागली ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।

पावसाचे थेंब पडती
हलकेच तापत्या उन्हात
तशीच किमया घडे
हाती येता तुझा हात
वाट पायातली मग क्षणात सरकू लागली ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।

जगण्याला अर्थ नवे
बहरणे वाटते हवे
मन नभात उडू लागते
सोबतीला आकांक्षांचे थवे
मनातल्या निराशेची पाने हलकेच गळू लागली ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।


- अमित जहागीरदार
  मे २००५

No comments:

Post a Comment