Sunday, May 8, 2016

आज खुप भरून आलय

आज खुप भरून आलय

आज खुप भरून आलय
सवयीच्या वेळी ऊठून
सवयीच्या प्रमाणात कॉफी, दुध अन् साखर मिसळून
सवयीच्या जागी बसलेल्या त्याला मी कॉफीचा कप दिला

सवयीने त्याने मला थँक्स म्हटल
पण मी मात्र तिथेच घुटमळत राहीली
मी त्याच्याकडे बघून म्हटले " आज खुप भरून आलय"
त्याला गवसली कपाच्या तळात जमलेली साखर
पण माझ्या बोलण्याकडे लक्ष गेलं

आकाशाच्या दिशेन बघून तो म्हणाला,
"नाही ग पाऊस नाही पडणार."
पण तु म्हणतेस तर कारने जातो. आणि तू ??
तो तितकाच शांत जितक्या शांतपणे मी म्हटले
"बस आता"

-अमित जहागीरदार
३ अॉगस्ट २०१५
पुणे

Saturday, May 7, 2016

जीवना कुठे होतास तू ?

जीवना कुठे होतास तू ?

एक दिवस असा आला
वाटले मी जगलोच नाही
जीवना कुठे होतास तू ?
का तुला भेटलोच नाही ??


मी रिते मन घेवूनी
कितीदा आलो तुझ्या सदनी
मागायचे होते तुला बरेच
पण मी काही बोललोच नाही ।।

इथे मिळली दु:खाची साथ
सुख भेटताच का धरती हात ?
अश्रू माझेच फितूर झाले
मग मी पुन्हा रडलोच नाही ।।

तू झालास मृत्यू - माझा सखा
मी बहरून आलो आणि असा
आयुष्य फुकट गेल
मी कधी फुलालोच नाही

मला दु:ख मिळाले सदा
रडलो तुज पाशी कितीदा
राख माझी तुझ्या हाती
आणि म्हणतोय मी जळलोच नाही ।।

- अमित जहागीरदार
   १९ मार्च २००५


मला बहरायचं पुन्हा

मला बहरायचं पुन्हा 

मी असाच होतो  अस्ताव्यस्त
तुझ्या येण्याने आकार आला
अजून फुलले नाहीत फुल जरी
दगडावरी  अंकुर आला

तुझ्या नुसत्या सोबत असण्याने
मनात जादूचे तरंग उठले
विरून गेल दु:ख सगळ
शांत स्तब्ध मन उरले

तू आहेस सोबत यातच
मला सर्व मिळाले
आज बऱ्याच दिवसांनी
अश्रूंना हसू आले

तुझ्या येण्याने फुलले
माझ जीवन
या आशेवर जगतय
माझ मन

फुलेल तेव्हा फुलू देत
आता फक्त दु:ख उडू देत
मला बहरायचं पुन्हा
तुझ्या गंधात झुलू दे

- अमित जहागीरदार 
  मे २००५

नवी उमेद

पुन्हा माझी कविता मला कळू लागली
सहवासात चांदणी पुन्हा सजू लागली ।।

मी उघडताच डोळे
हसू तुझे उगवते
तुझ्या गंधाची झुळूक
पहाटे दारी येते
रात्र रोज माझ्या सवे आठवत तुला जागू लागली  ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।

दिवसभर मन झुरते
तुला पाहण्यासाठी
बांधतो  रोज नव्या
जन्मोजन्मीच्या गाठी
बागेतली कळी माझ्यासंगे खुलू लागली ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।

पावसाचे थेंब पडती
हलकेच तापत्या उन्हात
तशीच किमया घडे
हाती येता तुझा हात
वाट पायातली मग क्षणात सरकू लागली ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।

जगण्याला अर्थ नवे
बहरणे वाटते हवे
मन नभात उडू लागते
सोबतीला आकांक्षांचे थवे
मनातल्या निराशेची पाने हलकेच गळू लागली ।।
पुन्हा माझी कविता मला कळू लागली ।।


- अमित जहागीरदार
  मे २००५

मनाची व्यथा

मनाची व्यथा

प्रचंड एक हुरहूर मी एकटा असल्याची
त्यात एक टोचणी तू समोर स्तब्ध बसण्याची ।।

मी श्वास ओवाळून टाकले तुझ्या दोन डोळ्यांसाठी
डोळ्यांची तुझ्या एकच भाषा जाणीव काही नसल्याची ।।

मी फुलवले लक्ष मोगरे तनुवर तुझ्या स्पर्शांचे
तुला त्याच वेळी वाटते काळजी निर्माल्याची ।।

मी पूर्ण विरून जातो तुझ्या डोळ्यांच्या तेजात
तुला उगाच वाटते भीती वाढणाऱ्या अंधाराची  ।।

तुला जगाची ओढ अन हव्यात इथल्या चाली रिती
मला फक्त तू हवी आणि तहान तुझ्या प्रेमाची ।।


अमित जहागीरदार
७ जून २००१
दु ४.०० 

Sunday, May 1, 2016

जीवनाची दिशा

दिशा बदलली जीवनाची
सुटला कसा हात हातातुनी
रंग लागले हाताला जरी
वाट चुकली
फुलपाखरा मागे धावून  ।।


जगण्याचे प्रयत्न इथले
कालच मला गुपित कळले
मी माझा देखील नव्हतो अन्
नात्यांचे बंध एवढे कोरडे

सोबत तशी दोन दिवसांची
नवा प्रवास
मग नवा गडी शोधून ।।

कुणी असतो वेडा बापुडा
कुणाचा येथे व्यर्थ लढा
कुणास दु:ख दिसत हि नाही
आपण का त्यासाठी कुढा ?


व्यथा विना तक्रारीची
संपला रस्ता
मी जातोय थडग्यात झोपूनी ।।
दिशा बदलली जीवनाची
सुटला कसा हात हातातुनी ।।


- अमित जहागीरदार
   २२ एप्रिल २०१६

तू गेल्या पासून

तू गेल्या पासून


दिसताच तू 
मिठीत घेईन 
कुरवाळेन  केस तुझे 
हातात हात घेईन 

डोळ्यात तुझ्या बघत राहील 
आठवणीत तुझ्या गढून जाईन 
तुझे लाडिक चाळे 
बघत वेळ जाईन 
बघता बघता मोहून  जाईन  

पण तरी तू भेट एकदा 
आनंद होईन ते सोड पण 
डोळ्यात पाणी येईन 

कित्येक दिवस झाले,
वर्ष सरलीत,
एक थेंबही रडलो नाही 

तू गेल्या पासून तसा उरलोच नाही 
तू गेल्या पासून तसा उरलोच नाही ।।


- अमित जहागीरदार 
  २२ एप्रिल २०१६