Sunday, October 27, 2013

छंद

अजूनही कसा जीवंत मी
जगण्याची एक खंत मी ।।

गेल्याने तुझ्या श्वास गेले
जगण्याचे सर्व ध्यास गेले
कोरडा तरी वाहतो का संथ मी ।।

भोवतालचा शोधतो अर्थ
माझ्यात न  दिसला  कधी स्वार्थ
वाचवतोस स्वतः ला इतका बुद्धीवंत  मी ।।

वेगळा असे मी किती वेगळा
कितीदा ओरडलो फाडूनी  गळा
आभाळ दु:खं झेलणारा पंथ मी ।।

भोगले किती ? कसे विसरू आता
शब्द रुसती कोणतेही गीत गाता
डोळ्यात पाणी अन दाटलेला कंठ मी ।।

दिलेस दु:ख तू , मी स्विकारीले
श्वासात पेरुनी सन्मानिले
घायाळ करण्याचा तुझा छंद मी ।।

- अमित जहागीरदार
  २१ ऑगस्ट  २०१३
  पुणे 

Monday, October 14, 2013

सूर

सूर

पुन्हा सूर तेच आज मी  छेदिले
पहिले तुला अन सारे गवसले ।।


तू एक वेड होते लागले मनाला
नवा अर्थ आला या जीवनाला

मन होवून पाखरू आकाशात भिरभिरले ।।


मी रोज तुझ्या आठवणीत न्हातो
क्षण असा न एक जो तुझ्यावीण जातो

अन रात्रीने चांदणे स्मृतींचे बरसवले ।।


तो हात तुझा हातात घेवूनी
वाटे जावे दूर दूर देशी

तू संगे तर पावलात जग संपले
पहिले तुला अन सारे गवसले ।।

Monday, September 23, 2013

हाक

हाक…

शब्द गोठले कंठात, हाक ना मी मारली होती
तू मागे वळून पहिले अन मिठी माझी खुली होती ।।


मी जगलोच कुठे जेवढे जगायाचे होते
मी फ़ुललोच कुठे जेवढे फुलायचे होते
स्पर्शाने तुझ्या आत्ता कळी एक फुलली होती ।।


तो पूल  नदीवरचा तो सागरी किनारा
गंध तुझा घेवूनी वाहणारा वारा
जागवलेल्या रात्रीची चांदणी एक उरली होती ।।


यावे तू स्वप्नात अन दिवस माझा शुभ्र व्हावा
मरगळलेल्या मनावरी चैतन्याचा अभ्र व्हावा
कहाणी सारी माझी भोवती तुझ्या गुंफलेली होती  ।।


का व्हावे असे? हातातले हात सोडणे
वचन सात जन्माचे अन अर्ध्यात साथ सोडणे
आयुष्याच्या वजाबाकीची का गणिते मांडली होती ।।


मी शोधले तुझ्यात अर्थ माझ्या जीवनाचे
मी गाडले कितीतरी प्रश्न माझ्या मनाचे
धावलो मागे पण तू वळणावर पुढल्या वळली होती ।।


-अमित जहागीरदार
 पुणे
 १४ सप्टेंबर २०१३

 

Saturday, September 14, 2013

प्रेम …

प्रेम …
सूर्य मावळायला लागला की
पायांनी तुझी वाट धरणं
बोललीस काहीतरी छान की
अलगद तुझा हात धारण ।।

आपलंस चंद्राच चांदण
हलकेच मनाच माझ्या
तुझ्याकडे रांगण

तुझ्या डोळ्यात
खोल खोल गुंतण
आठवणीत तुझ्या
रात्र रात्र जागण

तुझ्या वाटेत
निपचित पडून राहण
तुझ्या हसण्या वर
मोर पिसासारखं वाहण

तुझ्या आनंदात
बेभान होऊन नाचण
आणि माझ्या दु:खाला तुझं
अश्रूंनी न्हाऊ घालण

दोन थेंब पडताच पावसाचे
तुझी आठवण येण
यालाच म्हणतात ना
कुणावर प्रेम जडण

- अमित जहागीरदार
२३ एप्रिल २०००
सांगली

विरह….

विरह….

आठवतो का तो रस्ता तुला
ज्यावरून आपण चालायचो
हातात हात घेवून
तास न तास
तो आहे तसाच काळाशार
पण घेतोय वाळक्या गवताचे श्वास
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का तो चंद्र तुला
आपण पाहायचो
जागवून पूर्ण रात
बसायचो त्या चांदण्यात न्हात
तो आजकाल उगवत नाही
किंवा लपून बसतो ढगात
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवत का ते झाड गुलमोहराचं
तू आणि मी भेटल्यावर हमखास फुलणारं
आता नुसतं जाणवतेय
त्याच हिरवेपण
त्याला आजकाल आठवत नाही
काय असत फ़ुलण
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का पूल नदीवरचा तुला
तू बघत बसायची पाणी झुळझुळणारं
मी शोधत बसायचो डोळ्यात तुझ्या
काहीतरी लुकलुकणार
आजकाल त्या पाण्यात काहीच नसत थरथरणारं
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवते का ती वाळू सागरावरची
जिच्यावर आपण छोटास घर रचयचो
एकच स्वप्न चार डोळ्यांनी बघायचो
जे होणार आहे साकार
पण ती वाळू आजकाल
घेत नाही कोणताच आकार
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का तुला तो प्राजक्त
तुझ्या वाटेत वाकडा सांडणारा
तुझ्या स्पर्शाने
लाजत फुलणारा
तो बहरायचा थांबलाय
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतोय का तो पाऊस तुला
पडायचा जेव्हा आपण भेटायचो
हातात हात घेवून चिंब भिजायचो
तो शिंपडायचा आपल्यावर
चैतन्याचा सडा
आजकाल मला वाटतो तो पूर्ण कोरडा
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

- अमित जहागीरदार
वर्ष -२०००
सांगली

भिजणे

भिजणे

आता कळलाय मला अर्थ
तुझ्या तसल्या बोलण्याचा
आणि तुझ्या नुसतेच पाय
पाण्यात बुडवून तसूभर भिजण्याचा
मी तुला म्हटलं
ये ना जरा अशी खोल पाण्यात
भीज न चिंब चिंब माझ्या
अथांग प्रेमात

तर तू म्हणालीस - नको
मी अशीच काठावर बसते
नुसते पाय भिजवले तर बर असतं
एवढ्या खोलवर गेल कि पाणी डोक्यात मुरत

मी म्हणालो भिजण्यात मौज असते
तुझ्या प्रेमात बुडून जावस वाटत
तर तू म्हणालीस अस काठावर राहणंच बर असत
मनात येईल तेव्हा भिजता येत
आणि क्षणात भिजलेल अंग कोरडा करता येत
मला वाटल तुला सर्दीचा त्रास आहे
म्हणून स्वताला जपतेस
पण तुला भिजायचं नसते माझ्या प्रेमात पूर्ण
म्हणून तू नुसतेच पाय टाकून बसतेस

आत्ता मला कळलाय मला अर्थ
तुझ्या त्या तसल्या बोलण्याचा
आणि तुझ्या नुसतेच पाय
पाण्यात बुडवून तसूभर भिजण्याचा

- अमित जहागीरदार
१२ एप्रिल 2000

देवपण

देवपण

भोगले किती मी आनंदाने ! आता तर दुखालाही दुख वाटले
अजूनहि दिलेस दुख तर
विचारावेसे वाटेल कि कोणी तुला देव म्हटले

मी पचवत गेलो वार तुझे कधी मनावरचेही
आणि जखमांमधून ही तुझे गाणे निघाले

पाडलेस तू माझे स्वप्न आकाशात नेवूनी
थरथरत्या हातांनी मी कित्येकदा आशांचे घर रचले

मी वाट बघितली रोज पहाट होण्याची
आणि तू सकाळी दारात माझ्या अंधाराला पाठवले

हे तसे रोजचेच आता तू मला मोजकेच श्वास देतोस
त्याबदल्यात मी तुला ओठांवरचे हसू दिले

दिलेस कधी सुख तू चुकून माझ्या ओंजळीत
त्यातही सवयीने मी दुख शोधले !!!!!!!!!

किती आहे दुख तुझ्याकडे किती मला जगावे लागेल
नेहमीच्या दुखासोबत हेच आता प्रश्न उरले !!!!!

- अमित जहागीरदार
18 ऑगस्ट 2012

अनाहूत

अनाहूत

खुलली मेहंदी हातावरी
कितीदा मनात माझ्या ||
सूर तुझे छेदिले मी
कितीदा गाण्यात माझ्या ||

मी झुरते तुझ्यासाठी
मी सजते तुझ्यासाठी
आले तुझे गंध चहूकडे
कितीदा घरात माझ्या ||

मी नव्हते रूपगर्विता
पण वाटे तू बघता
स्वप्नांचे सोहळे रचिले
कितीदा दर्पणात माझ्या ||

तुझा स्पर्श आठवताच
अगणित फुलती रोमांच
चांदण्यांची रात्र जागली
कितीदा मनात माझ्या ||

मी हरवते तुझ्यात
शोधते तुलाच सगळ्यात
तू गेलास दूर निघुनी
हलकेच आले ध्यानात माझ्या ||


अमित जहागीरदार
१३ मार्च २००५

प्रेम करा प्रेम

प्रेम करा प्रेम
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत
प्रेम केल कि आपल्याशी बागेतलं फुल बोलत ।।

मनात प्रत्येक क्षणी तीच अन तिचा विचार
भोवतालची सृष्टी सगळी भासते तिचा अविष्कार
तोच गंध ती हवा
तोच तारा एक नवा
गंधासवे होवून वारा वाहून जा
आकाशात होवून तारा डोलून जा

मग ते आकाशही इवलस वाटत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

प्रीतीच्या गाण्याशिवाय दुसर काही गात नाही
तिच्या आठवणी शिवाय एकही क्षण जात नाही
तिचा चेहरा तिचे डोळे
आपण होतो पुरते खुले

तिच्या डोळ्यातच सार विश्व दिसत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

आकाशात जेव्हा संध्येचे नारंगी रंग उधळू लागतात
आपल्याला नकळत तिच्या भेटण्याचे वेध लागू लागतात
तिचं बोलणं तिचं हसण
त्यात आपल भान विसरणं
तिच्या हसण्यावर वाहून जा
धुंद धुंद तिच्यात बुडून जा

त्यावेळी हृदय आपल धडधडायाच थांबत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

ढग जमतच आकाशात तिच्या घरी जायचं
कुठल्यातरी बहाण्याने तिच्यासोबत फिरायचं
पावसाची रिमझिम बरसात
हाती तिचा चिंब भिजलेला हात
ढगांवर नभातल्या डोलून जा
पावसाचा थेंब होवून बुडून जा

चिंब चिंब भिजणे त्या क्षणी कळत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

तिला म्हणावं काहीतरी आणलाय गोड तुझ्यासाठी
ती लाजतच मारावी गच्च तिला मिठी
सगळ सुख तिच्या मिठीत असत
चांदण आपल्या मिठीत हसत

तिथेच मनही आपल विसरून जा
एक होवून तिच्यात विरून जा

अन ओठांवरती ओठांच गाणं फुलत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

- अमित जहागीरदार
१९ नोव्हेंबर २०००

आयुष्य उतू जात आहे....

आयुष्य उतू जात आहे...

आयुष्य उतू जात आहे
मोठ्या मोठ्या सुखांच्या मागे धावतांना
छोट्या छोट्या दुखांनी ठेचाळतांना
जणू सवय दु:खांची झाली असता
चुकून आलेच सुख हातात तर
डोळ्याची कडा पाणावतांना
आयुष्य उतू जात आहे ||

वाटते तू येणार तू येणार
स्पर्शाने तुझ्या मन माझे फुलणार
तुझ्या सहवासात मी आकाशात झुलणार
विचार हे मनात सजवून
तुझी वाट पाहतांना
आयुष्य उतू जात आहे ||

मी तसा जगलोच कुठे
संघर्ष माझे श्वास होते
गाठणे उंच शिखर कोणते
असले कधी अमुचे ध्यास होते ?
कष्टांची डोळ्यात झोप होती
भुकेचे पोटात दोन घास होते
तरी उद्या पहाट होईल हि आशा फुलावतांना
आयुष्य उतू जात आहे ||

एकटीच अपुली इथली वाट
एका हातात दुसरा हात
पायाखालची जमीन अन
आकाशाची सोबत रात
एवढे एकटेपण कि
अनोळखी वाटे आपुलाच आवाज
या गर्दीतल्या वाटेवर धावतांना
आयुष्य उतू जात आहे ||

मनात तुझे प्रेम दाटले
जगणे हेच असावे असे वाटले
फुला फुलांशी हितगुज केले
जीवनात नवे रंग दिसले
तुझ्या आठवणीत डोळे मिटतांना
आयुष्य उतू जात आहे ||

-अमित जहागीरदार
१६ ऑक्टोंबर २०१२

Thursday, September 5, 2013

आयुष्य सुंदर वाटू लागतं …

आयुष्य सुंदर वाटू लागतं …


रंग फुलपाखराचे हातास लागले की
थवे भोवताली फुलांचे सजले की
मनात यावे काहीतरी
अन तसेच घडले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं ……

फिरावे एका हिरव्या रानात
अलगद झऱ्याचे पाणी हातात
भिरकावे गगनाच्या दिशेने
अन अंगावरी तुषार फुलले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

सवंगड्यासवे डाव नवे
स्वार  वाऱ्यावरी होऊन फिरावे
चाहूल लागताच मग संध्येची
रात्रीच्या कुशीत निजले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

उडत जावे भुंग्या मागे
कधी श्वान अपुल्या मागे
अन गाठावे गाव दुसरे
आभाळ श्वासात मावले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

चिंचेची वा बोरीची
लज्जत न्यारी चोरीची
लपंडाव व शर्यत अपुली
जिंकणे हरणे विसरले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

स्वप्नांच्या नव्या दिशा
भिजली चिंब जिद्दीत आशा
जग जिंकणे सोपे झाले की
संध्येला दान समाधानाचे दिले की
अर्ध्य पहाटेला स्वप्नाचे अर्पिले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

- अमित जहागीरदार
पुणे
०४/०९/२०१३


 

Tuesday, September 3, 2013

बळ जगण्याचे .....

बळ जगण्याचे  .....

आणू कुठून बळ जगण्याचे
कंठ आला दाटुन
सुटले हात हातातून
पायात वाट अडकलेली
त्राण न पाउल टाकण्याचे
आणू कुठून बळ जगण्याचे ।।

भीती सु:खांची वाटू लागली
मनात निराशाच दाटू लागली
श्वासांनी दिले नवे ओझे
दडून बसले अश्रू रडण्याचे
आणू कुठून बळ जगण्याचे ।।

हे का असे? हा प्रश्न नाही
दैवावरही न विश्वास काही
पण चुका घडतात ना देवाकडूनही
मग मिळाले कधी क्षण आनंदाचे
आणू कुठून बळ जगण्याचे ।।

मी कुठे मागितले आकाश
दे फक्त आनंदाचे दोन श्वास
का तू धडपडतोस इतका
मला देण्यास हे दु:ख मरणाचे
आणू कुठून बळ जगण्याचे ।।
आणू कुठून बळ जगण्याचे ।।

अमित जहागीरदार
पुणे
०३/०९/२०१३