Thursday, September 5, 2013

आयुष्य सुंदर वाटू लागतं …

आयुष्य सुंदर वाटू लागतं …


रंग फुलपाखराचे हातास लागले की
थवे भोवताली फुलांचे सजले की
मनात यावे काहीतरी
अन तसेच घडले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं ……

फिरावे एका हिरव्या रानात
अलगद झऱ्याचे पाणी हातात
भिरकावे गगनाच्या दिशेने
अन अंगावरी तुषार फुलले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

सवंगड्यासवे डाव नवे
स्वार  वाऱ्यावरी होऊन फिरावे
चाहूल लागताच मग संध्येची
रात्रीच्या कुशीत निजले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

उडत जावे भुंग्या मागे
कधी श्वान अपुल्या मागे
अन गाठावे गाव दुसरे
आभाळ श्वासात मावले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

चिंचेची वा बोरीची
लज्जत न्यारी चोरीची
लपंडाव व शर्यत अपुली
जिंकणे हरणे विसरले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

स्वप्नांच्या नव्या दिशा
भिजली चिंब जिद्दीत आशा
जग जिंकणे सोपे झाले की
संध्येला दान समाधानाचे दिले की
अर्ध्य पहाटेला स्वप्नाचे अर्पिले की
आयुष्य सुंदर वाटू लागतं …
आयुष्य सुंदर वाटू लागतं …

- अमित जहागीरदार
पुणे
०४/०९/२०१३


 

No comments:

Post a Comment