Monday, July 27, 2026
मी राधेचा कान्हा
काय घेतले कवेत
काय घेऊन आलो
काय घेऊन आलो
काय घेतले कवेत आहे
जगण्याचा छंद निराळा
काय इथल्या हवेत आहे
जुन्या हिशेबाच्या किती फाडल्या इथे वह्या
स्वतःला मी विसरलो किती बदलल्या तऱ्हा
काय सांगू विधात्याला
काय त्याचे गूढ बेत आहे
मागती इथे सगळे जन्म जन्मांची नाती
शेवटी असे तरी का मूठ त्यांची रिती
निवांत क्षण तोच आता
लाकडांची सेज आहे
अमित जहागीरदार
पुणे
१७ जून २०२५
Saturday, March 14, 2026
सूर्य नवा पुन्हा उगवेल
Sunday, October 12, 2025
हा पाऊस नवा होता
पाहिलेत किती मी जरी , हा पाऊस नवा होता
प्रत्येक थेंब सांगून गेला, तू जवळी हवा होता ।।
मोजलेच नाही मी, मोहून गेले किती वेळा
मी भिजले होऊन राधा, तू माझा सखा होता ।।
मी मजला कळू लागले, पावसाचे थेंब जसे
मी झाले आसंमत, तू माझा थवा होता ।।
मी बोलावले तुला, जवळी माझ्या
ती माझी स्पंदने, तुला वाटले पारवा होता ।।
येण्याने तुझ्या सुखाचे सूर गवसले
तिहाई गाठलेला तो दुःखाचा मारवा होता ।।
ये माझ्याकडे, विरघळून जा माझ्यात
नुसताच अपुल्यात अजूनही , धुंद गारवा होता ।।
अमित जहागीरदार
९ जून २०२०
(लॉक डाउन )
Monday, September 15, 2025
निराळा पाऊस
पाऊस हा निराळा होता
बरसत आला असा पाऊस हा निराळा होता
भिजलो चिंब तुझ्यात आठवणींचा उजाळा होता
कुठला थेंब शमवी वणवा मनातला
न समजण्या तू का इतका भोळा होता ?
तरंगती मनात स्वच्छंद ढग भावनांचे
तू निळ्या आभाळासम मोकळा होता !!
मला वेध अंगणी पारिजात बहरण्याचे
येण्याने तुझ्या नवा मोगरा फुलला होता
आलेत कितिदा वसंत फेर धरूनी
अंकुर मनातला तेवढाच कोवळा होता
अमित जहागीरदार
पुणे
१५ सप्टें २०२५
Thursday, January 2, 2025
मज द्यावे कुणी आकाश आणुनी हाती
पंखांचे रंग फुलावे सूर जुळत जाती
मी अचेतन असतो
दूर तुझ्याविना
मनी विचार येई
झंकारती वीणा
चातकाची तहान थोडी चांद थिजतो आकाशी
या देहाचे देणे लावतो
कळते मग मी का जगतो
भास होती तुझेच सारे
गंधात तुझ्या वाहतो
व्यापले मन काळोखाने पेटती जिवाच्या लाख वाती
मज द्यावे कुणी आकाश आणुनी हाती
— अमित जहागीरदार
२ जाने २०२५
पुणे
Monday, January 23, 2023
अपूर्ण वर्तुळ
अपूर्ण वर्तुळ
कोण? कुठला ? नाव काय ? कोणते कुळ ?
फिरतोय दिशा दाही पूर्ण करण्यास वर्तुळ ।।
मोजले कुठे कधी डोळ्यातले पाणी
कळली नाही काय व्यथा न कहाणी
हसणे ओठावर तर दुःख खोल अन गूढ ।।
भोगले ते भासे आकाश
आनंदाचा कुठे असे वास ?
हिशेब "तो" करे पण हाती असे आसूड ।।
उमेद जगण्याची शोधून थकलो आता
हात जोडले अन टेकवितो माथा
शांत कर वादळ हे ! शोध खरे मूळ
मातीचा म्हणे जपतो धर्म
मातीचं जाणे सारे कर्म
मातीत मिळण्या का जन्मलो ? काय जडले खूळ
फिरतोय दिशा दाही पूर्ण करण्यास वर्तुळ ।।
अमित जहागीरदार
१९ जानेवारी २०२३