Monday, July 27, 2026

गंधच  यावा आत्म्यातून

डोळ्यात बघ माझ्या
अश्रुंचे न गीत तिथे
होणार न वाफ त्यांची
अश्रूंची न रित तिथे

जगावे गुणगुणावे गाणे
कधी जुने कधी नवे
शद्ब सच्चे हवे
सूर जुळून येती जसे

अपयशाची ना भीती तिथे
पायात काटे किती टोचले
नेहमीच कुणापेक्षा कमी असते
वाटते जरी आपण किती सोसले

यश मिळाले तर बघावे वरती
आहे अजून नवे क्षितिज बाकी
गाठले हे जे नसे थोडके
जरी मागे थोडी चीज बाकी

मनाचे पुरवावे न लाड
कधी कधी कठोर व्हावे
आपुलेच बापुडे मन ते
कधी न ते मुजोर व्हावे

मनाला नको विश्राम
तन जरा थकले  जरी
गंधच  यावा आत्म्यातून
मागे शरीर उरे जरी

अमित जहागीरदार
२२ जून २०२०


अहंकार

अहंकार

काही बोथट काही धारदार शब्द
कागदाची नाजूक आवरण तोडून
 पेनातल्या शाई कडून  रंग उधार घेऊन
आलेत नाचत कागदावर

आवडले कुणाला तर कुणी नाकं  मुरडली
काही त्यातली लाजलीत

पण काही गेलीत  रुसून

....... ........
कोरड्या घश्याला भावनेच्या सागरात बुडवून
पहाटेच्या दवांकडून  आर्दता चोरून
सूर्यास्ताकडून केशरी रंग घेऊन
गवतांकडून गर्द  हिरवा
आकाशाचा निळानिळा
रात्रीचा काळा 

सगळे सगळे पहिले करून
शब्द पुन्हा हसले नाहीत
तसे बापडे पुन्हा फुलले नाहीत

उदास होऊन मी त्या कागदांच्या नाव केल्यात
आणि पाण्यात टाकल्या
अन त्यांच्या कडे पाहत  राहिलो
भुरभुरणाऱ्या वाऱ्यावर वाहत गेल्या त्या नावा
आणि मी पावसाची गाणी गुणगुणत राहिलो 

 ......... .........

शद्बाचा रुसवा तसा महाग पडला
पेनाच्या आणि कागदाच्या किमती पेक्षा

अलगद मी एक सुरुवात केली ..
वाक्य लिहिलं कि
तुह्मी आहेत म्हणून मी आहे

पेनातून शाई वाहू लागली
कागदाने शब्दांचे स्वागत केले
चेहऱ्यावरच्या प्रश्नांना वाचून शब्द एवढेच म्हणाले

अरे एखाद वाक्याची सुरुवात तरी "मी" ला सोडून कर ....
तू, तुम्ही
आपण आम्ही
बर  असत ...

इतकं मी ला काय कुरवाळतो  ??


- अमित जहागीरदार
२ जून २०१५ २३:५५

उरते रे अशीच

उरते रे अशीच 


मंद श्वास झालेत दीर्घ 

ओठांचे दिलेस अर्ध्य 

स्वर्गाची घेतली चव 

वाटले न जीवन व्यर्थ 


का इतका राकट तू 

उष्ण श्वासांचे सावट तू 

भीनतो नसानसात तू 

कधी न रिता घट तू 


किती पूजावे तुला 

किती द्यावे तुला 

देऊनही सारे काही 

असतेच हवे तुला 


भूक ना वाटे ही तनाची 

मज कळे व्यथा मनाची 

मी हवी तुला पुन्हा 

मागणी कणकणाची 


मी ही झुरते रे अशीच 

मी ही फुलते रे अशीच 

वाटते विरुन जावे 

तरी उरते रे अशीच 


- अमित जहागीरदार 

 १ सप्टें २०२३

 पुणे 

मी राधेचा कान्हा

मी राधेचा कान्हा

भास हे झाले पुन्हा डोळ्यांचा तो काय गुन्हा 
दिसली तू पुन्हा अशी जागला आवेश जुना ।।

पाहुनी मी वाट तुझी 
घेऊनी अंगी लाट तुझी'
मावळू न दे आता 
धुंद मंद रात  तुझी 
बहराला चाफ्याने मनातला  कोपरा सुना ।।

त्या जन्मांचे पूण्य माझे 
नसेन ते नगण्य तसे 
म्हणुनी भेटले सुख 
मी जाहलो धन्य असे 
नको जन्म सात, असो मी राधेचा कान्हा ||

अमित जहागीरदार 
पुणे, १९ मे २०२५

काय घेतले कवेत

काय घेऊन आलो


काय घेऊन आलो

काय घेतले कवेत आहे 

जगण्याचा छंद निराळा 

काय इथल्या हवेत आहे 


जुन्या हिशेबाच्या किती फाडल्या इथे वह्या 

स्वतःला मी विसरलो किती बदलल्या तऱ्हा 

काय सांगू विधात्याला 

काय त्याचे गूढ बेत आहे 


मागती इथे सगळे जन्म जन्मांची नाती 

शेवटी असे तरी का मूठ त्यांची रिती 

निवांत क्षण तोच आता 

लाकडांची सेज आहे 


अमित जहागीरदार 

पुणे 

१७ जून २०२५

Saturday, March 14, 2026

सूर्य नवा पुन्हा उगवेल

सूर्य नवा पुन्हा उगवेल

मोडलो नाही इतका 
की काळजातली वीज विझेल
कोवळे नाही मन तसे 
की एका मलय मारुताने झिजेल 

आसमंतात ध्रुव तारा 
ढळेल का तो जरासा
पण रात्र ती वादळाची 
काही क्षणात सरेल 

संधिकाळी कधी कधी
जागे निरसता मनी अशी
पण हवा विश्वास हा 
सूर्य नवा पुन्हा उगवेल

अमित जहागिरदार 
पूणे 
१४ मार्च २०२६

Sunday, October 12, 2025

हा पाऊस नवा होता


पाहिलेत किती मी जरी , हा पाऊस नवा होता 

प्रत्येक थेंब सांगून गेला, तू जवळी हवा होता ।।


मोजलेच नाही मी, मोहून गेले किती वेळा 

मी भिजले होऊन राधा, तू माझा सखा होता ।।


मी मजला कळू लागले, पावसाचे थेंब जसे 

मी झाले आसंमत, तू माझा थवा होता ।।


मी बोलावले तुला, जवळी माझ्या 

ती माझी स्पंदने, तुला वाटले पारवा होता ।।


येण्याने तुझ्या सुखाचे सूर गवसले 

तिहाई गाठलेला तो दुःखाचा मारवा होता ।।


ये माझ्याकडे, विरघळून जा माझ्यात 

नुसताच अपुल्यात अजूनही , धुंद गारवा होता ।।


अमित जहागीरदार 

९ जून २०२०

(लॉक डाउन )