Tuesday, July 30, 2019

बोन्साय

बोन्साय


जुनी पुराणी पत्रे तुझी
फाडताना हात दुखलेत
कागदांचा गर्द धूर झाला
शब्द मात्र मागे उरलेत ।।

हलक्याच हाताने
गुलाबी कागदावर
तू प्रत्येक शब्द लिहला होता
विश्वास ठेव
जाळताना मी हि अर्थ त्यातला
मनात कोरला होता ।।

आता ते कागद नसतील
पण मनाच्या कप्प्यात त्या भावना असतील
कधीच उघडायचा नाही तो कप्पा असं ठरेल
पण काही तासात ते बेत फसतील ।।

तू मात्र घाबरू नकोस
त्या आठवणींचं होईल काय
कितीही दिवस सरले तरी
असं किती वाढत रे बोन्साय ।।

- अमित जहागीरदार
    ४ ऑगस्ट २०१७

Tuesday, June 25, 2019

येऊनी तुझ्या चरणी

येऊनी तुझ्या चरणी 

तुलाच शोधिले
दिसताच पूजिले
होतास कुठे?
कितीदा पुसले ।।

वादळांच्या वेटोळ्यात
गर्दीच्या गलक्यात
अंतरीचे गीत माझ्या
तूच ना रे ऐकिले ।।

मी न असे नास्तिक
पण भावनांची भीक
घालून कुणास तू
काय आजवरी दिले ।।

हात घेऊन हाती
ने मज पैलतिरी
तिथे भेटेल प्रिती
आणि सत्य मनातले ।।

नामात तुझ्या वेडा मी
मार्गातला खोडा मी
होईल पुन्हा खरा मी
पुजता विठ्ठल्ले ।।

भार होता मनावरी
वाटे तो मोरपिसापरी
येऊनी तुझ्या चरणी
जग मी सारे जिंकले ।।

अमित जहागीरदार
२४ जून २०१९


Saturday, April 20, 2019

हातावरल्या रेषा

हातावरल्या रेषा 

ये अशी स्वप्नात माझ्या तेवढीच भेट होते 
कधी हातांची कधी नजरेची वा थेट होते ।।

पाहिलेस माझ्याकडे रागाने तू कित्येकदा.. 
लाडिक नजरांनी तुझ्या मग समेट होते ।।

येत नाहीस तू अन मनात दाटते काजळी 
येऊन चिंब करणारी तू की नभात मेघ होते ?

आठवणीत तुझ्या फेसाळणारा सागर झालो 
चाललो इतके जरी काटे तुझ्या वाटेत होते ।।

धन्य झालो जेव्हा तुला पाहिले आम्ही 
प्रेम हे असले कुठे हातावरल्या रेषेत होते ।।

-अमित जहागीरदार 
  ६ डिसें २०१८
  पुणे 

Thursday, January 17, 2019

राधा मी तुझी

राधा मी तुझी 

मी तुला पाहिले
अन होते ते वाहिले
मनावरी  कोरिले
नाव तुझे

ओढ भेटीची मनी
दिस संपे एक क्षणी
वाट तुझी पाहुनी
जीव जळतो

हुरहूर तुझी अशी
नटले मी कितीही जरी
चांदणे नेसले तनुवरी
वाटे कणभर

बाहुत बाहू जरी गुंतले 
अंतरआपुल्यातले संपले
मन अलगद तरंगले
भरले नाही

आठवणीसाठीच का भेट
विचारात तुज थेट
उत्तर तुझे नुसतेच
गोडं हास्य

येशील ना मना
सख्या सवंगड्या पुन्हा
होऊन माझा कान्हा
राधा मी तुझी

१६ जान २०१९
बंगळुरू