Monday, January 23, 2023

अपूर्ण वर्तुळ

अपूर्ण वर्तुळ 


कोण? कुठला ? नाव काय ? कोणते कुळ ?

फिरतोय दिशा दाही पूर्ण करण्यास वर्तुळ ।।


मोजले कुठे कधी डोळ्यातले पाणी 

कळली नाही काय व्यथा न कहाणी 

हसणे ओठावर तर दुःख खोल अन गूढ ।।


भोगले ते भासे आकाश 

आनंदाचा कुठे असे वास ?

हिशेब "तो" करे पण हाती असे आसूड ।।


उमेद जगण्याची शोधून थकलो आता 

हात जोडले अन टेकवितो माथा

शांत कर वादळ हे ! शोध खरे मूळ  


मातीचा म्हणे जपतो धर्म 

मातीचं जाणे सारे कर्म 

मातीत मिळण्या का जन्मलो ? काय जडले खूळ 

फिरतोय दिशा दाही पूर्ण करण्यास वर्तुळ ।।


अमित जहागीरदार 

१९ जानेवारी २०२३