Friday, March 16, 2018

आई आज तू असायला हवी होतीस

आई आज तू असायला हवी होतीस 


आई आज तू असायला हवी होतीस
तुझा - तुझ्याविना चाललेला संसार
दुरून बघायला
तू आज असायला हवी होतीस ।।

बाबाला ब्रेड वरती जॅम देखील नीट लावता येत नाही
घाई झाली कि पायात मोजे देखील घालता येत नाहीत
माझ्यासोबत पोट धरून हसायला
तू आज असायला हवी होतीस ।।

मी माझी सकाळी वेणी घालून शाळेला जाते
बाबाने घालून दिलेली वेणी काही तासच टिकते
माझ्या विस्कटलेल्या वेणीवरचे jokes ऐकायला
तू आज असायला हवी होतीस ।।

अभ्यास घेतांना माझ्यापेक्षा बाबाला झोप जास्त येते
office मधल्या तणावानंतर त्याची मागणी रास्त असते
झोपलेल्या बाबाला कुरवाळतांना बघायला
तू आज असायला हवी होतीस ।।

मी तशी शूर आहे ! घाबरवायला येतो रात्रीचा अंधार
तुझ्या मायेची उब आठवते अन मिळतो त्याचा आधार
पण कौतुकाची थाप पाठी द्यायला
तू आज असायला हवी होतीस ।।

एकटीच असते- शून्यात बघते ! जग म्हणत सगळ तेव्हा
माझ्या मनात तू आणि नातं आपुल, भासत वेगळं तेव्हा
माझं विश्व तू असं मिठीत घेऊन म्हणायला
तू आज असायला हवी होतीस ।।

पण आई हा असा विरह नसता तर
हे सगळे प्रश्न नसते
आयुष्य इतके क्लिष्ट नसते
मला तर नाही कळत असत किती वेगळं
पण त्याचा अनुभव द्यायला


तू आज असायला हवी होतीस ।।
आई तू आज असायला हवी होतीस ।।


अमित जहागीरदार
१३ मे २०१७
पुणे