Tuesday, February 13, 2018

प्रेमात तुझ्या पडल्यापासून

प्रेमात तुझ्या पडल्यापासून

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळल काय असत
आपल्या कुणाची वाट बघण
अन दिसताच तू
कळत चातकाला श्रावण मिळण ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
श्वासात मी गंध भरू लागलो
खुल्या भकास आकाशात
प्रीतीचे रंग  भरू लागलो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
लांब वाटा लहान झाल्या
तुझ्या डोळ्यांच्या दोन ज्योती
जीव का प्राण झाल्या ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
चंद्र माझ्याशी रोज बोलतो
वेडेपणाच्या किस्स्यांवर तुझ्या
दिल खुलास हसतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मनात लाखो तरंग उठतात
बागेतल्या फुलपाखरांचे जसे
हातावरती रंग सुटतात ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
आकाश अगदी इवलास वाटत
बहरलेल्या पारिजताका सारखं
हसावस वाटत  ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळायला लागलाय :
समुद्रात का लाटा उठतात
तुला भेटून जाताना
माझ्या का वाटा चुकतात ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
शुक्राची चांदणी मंद हसते
अन रोजची नीरस संध्याकाळ
मला आता धुंद भेटते  ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मी सूर्यास्त रोज बघतो
अन  त्या नारंगी किरणात
मनसोक्त भिजतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
गार हवा अंगाला बोचू लागते
अन तुझ्या वर एक कविता
तू भेटली कि सुचू लागते

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मोर थुई थुई नाचू लागला
अन वारा शिळ घालत
तुझे गाणे गावू लागला ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
खांद्यावर माझ्या पाखर रुळतात
आणि बघून मला शेतातली
कणस डुलतात ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कोकिळेची तान कळते
अन तुझ्या आठवणीच्या
चंद्राची रात्र जळते ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळल का असतो रंग निळा आकाशाचा
अन का क्षणात जातो
पाण्याबाहेर प्राण माश्याचा ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
रात्र माझ्याशी बोलायला येते
अन एक वेडी चांदणी
कुशीत माझ्या निजायला येते ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
काय असते मुक्ती कळली
अन प्रेमात असलेली भव्य दिव्य
शक्ती कळली ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मी निशिगंधाचे फुल होतो
पडताच पाऊस
गंध पसरवणारी धूळ होतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
कळली मला गुलाबी थंडी
अन मोगऱ्याच्या कळ्यांची
कळली मदिर धुंदी ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
मी पाखरांचा रव होतो
पहाट प्रहरी जमणारे
पाकळीवरचे दव होतो ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
समजायला लागलाय नदीच वाहण
अन मिलनास आतुरलेल्या
सागराच्या कुशीत शिरणं ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
येतो तुझ्या वाचून जगण्याचा वीट
हवा हवासा वाटतो
तुझ्या हातांचा स्पर्श धीट ।।

प्रेमात तुझ्या पडल्यापासून
जीवन झालाय सार्थ
तू माझ्या प्रेमाचा सागर
मी तुझा तृषार्त ।।



अमित जहागीरदार
१४ फेब २००० ते २०१८