Sunday, December 31, 2017

नवी वाट

नवी वाट

सांजवेळी आलीस तू अन माझी पहाट झाली
सूर हरवले होते माझे तू  नवे गीत गात आली ।।

ह्या मनात माझ्या एक होता वाळवंट
कोरडे चहूकडे, दु:ख आणिक खंत
फुलून यावे सर्व दिशांनी अशी तू बरसात झाली ।।

वाट पहिली ज्याची ते क्षण दाटून आले
तृप्त जाहलो मी अन मन बहरून आले
सखा मी झालो त्या तारकांची उगवून रात अली ।।

तू येशील ! हे ठाऊक होते
प्रेम हे जरी माझे मूक होते
मी शब्दांचा सागर अन तू स्पर्शाची होऊन  लाट आली ।

मी माझा होण्यासाठी
मी तुझ्यात मिसळण्यासाठी
एक होऊन पुढे जाण्यासाठी पायात नवी वाट आली ।।

- अमित जहागीरदार 

होकार

होकार

वेड लागले आम्हा तुझेच गीत गात राहणे
दिवस वाळका तसाच येतो काळोखाने रात जाळणे ।।

घन  निळे आकाश लाल झाली किनार
तू दिसली अन छेडिली मनाची तार
तसे  दुःख उडून गेले असे घडले कात टाकणे ।।

तू प्राण होतीस श्वास माझे चोरिलें
नयनांनी आपुल्या स्वप्न उद्याचे देखील
भेटणे मग रोजचे कधी हातात हात असणे  ।।

मनात तू येतेस आणि भोवती गंध यावा
जगणे शिकविले तू रंग दिला तूच नवा
मग कधी जमेल होकाराची बरसात करणे  ।।

- अमित जहागीरदार
१४ जानेवारी २००५
पुणे 

Wednesday, October 25, 2017

तृप्त

तृप्त 

बघशिल माझ्या डोळ्यात तर 
चित्र तुझे दिसणार नाही 
पण तुझ्या डोळ्यात पाणी असता 
मी कधी हसणार नाही ।।

हात हातात घेऊन चालणे 
प्रत्येक क्षणी जमणार नाही 
पण तुला गरज भासल्यास
मी दूर जाणार नाही ।।

मिठीत ये ! म्हटले असता 
लगेच मिठीत येेणे जमणार नाही 
पण तुला हवे काय आणि केव्हा 
याचा विसर पडणार नाही ।।

साथ जन्मभराची आपुली 
असे वायदे करणार नाही 
पण मी असेल सोबतीला तर 
ऐकटे  तुला वाटणार नाही ।।

भेटावे पुढल्या जन्मी 
हि आशा मी ठेवणार नाही 
पण तृप्त होऊन जगू इतके कि 
मागे काही उरणार नाही ।।

अमित जहागीरदार 
२५ Oct  २०१७